

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रशासकीय तयारीने वेग घेतला असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीतील उपस्थितीवरून साधू -महंतांमध्ये 'असली- नकली'वादाला सुरुवात झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती महाराज यांनी महंत सुधीरदास यांच्या महंताईवर आक्षेप घेतल्यानंतर निर्मोही अनी आखाड्याचे प्रमुख महंत राजेंद्रदास महाराज यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सिंहस्थ बैठकीतील साधुंच्या उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित करत आखाडा परिषदेच्या साधू-महंतांच्या उपस्थितीतच सिंहस्थाची खरी बैठक होईल, असा दावा केल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन या वादावर काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर येत सिंहस्थाचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर येथील काही आखाड्यांच्या साधू-महंतांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.२४) जिल्हाधिकारी जलज शर्मा व महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालयात साधू-महंतांची बैठक घेतली. यात साधुंबरोबर काही धार्मिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीत विविध सूचना मांडतांना कुंभमेळा नामकरणावरूनही वादग्रस्त वक्तव्ये केली गेली. यावरून आखाडा परिषदेचे पदाधिकारी चांगलेच नाराज झालेत. निर्मोही अनी आखाड्याचे प्रमुख महंत राजेंद्रदास महाराज यांनी या बैठकीतील उपस्थितीवरून तीव्र आक्षेप नोंदविला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा १३ आखाडे आणि अ. भा. आखाडा परिषदेशी संबंधित आहे. कुठल्याही अन्य संस्थांचा सिंहस्थाशी संबंध नाही. त्यामुळे नकली साधू प्रशासनाशी कशी चर्चा करू शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात प्रशासनाला चांगली सुरुवात करावी लागेल. त्यासाठी अ. भा. आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि अन्य १३ आखाड्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून मे महिन्यात प्रशासनाने बैठक घ्यावी. या बैठकीत आखाडा परिषद आपल्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करील. तीच साधुंची अधिकृत भूमिका असेल, आखाड्यांच्या साधुंव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रशासनाने महत्त्व देऊ नये, असे महंत राजेंद्रदास महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.
त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती महाराज यांनी नाशिकमधील महंत सुधीरदास पुजारी यांच्या महंताईवर आक्षेप घेतला आहे. सुधीरदास यांनी मात्र, हे आक्षेप फेटाळून लावले आहेत. ११ एप्रिल २००४ रोजी आपण निर्वाणी आखाडा खालसाचा श्री महंत झालो, याबाबत संबंधितांची स्वाक्षरी असलेले पत्र तसेच अन्य पुरावे आहेत. महंताई रद्द झाली असेल तर त्या आखाड्याने तसे पत्र आपणास द्यायला हवे होते. मात्र, ते पत्र अद्याप आपल्याकडे आलेले नाही. उलट आखाड्याकडून दिले जाणारे सन्मानपत्र आपल्याकडे आहे. वास्तविक, शैव आखाड्यांशी आमचा काही संबंध नाही, आमचा वैष्णव आखाडा आहे, असे महंत सुधीरदास यांनी सांगितले.