

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येणारी सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावीत आणि त्यासाठी कामांच्या प्रक्रियेला गती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहता, आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा सुरक्षित व पर्यावरणपूरक व्हावा यासाठी नियोजनाची सुरुवात आतापासूनच करावी, भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले. यावेळी महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना करण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
यावेळी आ. देवयानी फरांदे, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सा. बां. विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबक मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के आदी उपस्थित होते.