

नाशिक : सिंहस्थ प्राधिकरणाचा प्रस्ताव या आठवड्यात शासनाकडे पाठविणार असून, त्याला त्वरित मान्यता देण्यात येईल. प्राधिकरणामुळे कामांना गती येईल, प्रत्येक खात्याशी स्वतंत्र संपर्क करण्याची गरज पडणार नाही. प्राधिकरण हे एक खिडकी योजनेप्रमाणे काम करेल यामुळे कामांना तत्काळ मंजुरी मिळेल, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि. 9) गंगाघाट, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक ठिकाणांची पाहणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांनी अधिकार्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मंत्री महाजन म्हणाले की, गोदावरीत कारखान्यांचे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरीची स्वच्छता करणे हा प्रमुख मुद्दा आहे. सिंहस्थासाठी पाण्याचे स्टोरेजदेखील वाढवावे लागेल. त्यासाठी किकवी धरणाचे काम वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. किकवी धरणाचे काम पूर्ण झाल्यास 3 टीएमसी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथील पूल, एसटी स्टॅण्ड यांची पाहणी केली असून, आगामी काळात त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. कुंभसाठी देश-विदेशातून येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता हेलिपॅड, विमानतळ आणि पार्किंगच्या निर्मितीवर अधिक भर देण्यात येणार असून, 15 हेलिपॅडची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा पावसाळ्यात येत आहे. प्रयागराज कुंभचा अनुभव बघता नाशिकच्या कुंभला गेल्या कुंभमेळ्यापेक्षा चौपट गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत जागा कमी असल्याने आव्हाने अधिक असणार आहे. गर्दी विचारात घेता पाच घाटांची निर्मिती करण्यात येईल. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागालाही सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा उत्साहात साजरा करणे हीच केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही. नाशिक हे परमपवित्र तीर्थस्थळ असून, नाशिकचा केवळ कुंभमेळ्यापुरताच विचार करता येणार नाही. नाशिक जिल्ह्यात वणी, त्र्यंबकसह इतरही धार्मिक स्थळे असल्याने जगभरातील भाविक, पर्यटक नाशिकला भेट देत असतात. लोकांचा ओढा नाशिककडे वाढावा म्हणून कामे चांगली करावी लागणार असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
रामकुंड आणि त्र्यंबकनगरीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. तो काढावा लागणार आहे. यासाठी काही जणांना नुकसानभरपाई देण्यात येईल. गर्दीच्या तुलनेत कुंभाची जागा छोटी आहे. त्यामुळे साफसफाई करावी लागेल. अतिक्रमण काढण्याच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल. शहरातील गटारी, नाले आदींच्या दुरुस्तीवर भर देण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे गेल्या कुंभमेळ्यात ज्या शेतकर्यांच्या जमिनी आरक्षित केल्या त्यांना जागेचा मोबदला देणार आहे. यावर्षी जमिनींचा प्रश्न निकाली काढणार असल्याची माहिती यावेळी मंत्री महाजन यांनी दिली.
रेल्वेस्थानकाबाबत वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठका सुरू आहेत. सिंहस्थ कुंभ पावसाळ्यात येत असल्याने नाशिक रोड रेल्वेस्टेशनच्या बाजूला शेडची निर्मिती करावी लागेल. दिल्लीत तशी व्यवस्था नसल्याने भाविकांचे हाल झाले. नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या बाजूने 30 आणि 60 मीटरचे रस्ते झालेले आहेत. त्यांचाही उपयोग करून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत दोन दिवसांत निर्णय होणार होता, असे आपण सांगितले होते यावर महाजन म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीच दोन दिवसांत निर्णय होईल, असे सांगितले होते. यावर गेल्या भेटीत 'तुम्ही देवावर विश्वास ठेवा असे सांगितले होते त्याचे काय झाले?' असे विचारले असता 'काय करणार, सध्या देवच पावत नाही' असे महाजनांनी सांगताच एकच हशा पिकला.