

नाशिक : नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या कामांकरिता महापालिकेच्या २०२५- २६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तब्बल ४३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद उपलब्ध करण्यासाठी महापालिकेच्या तब्बल २०० कोटींच्या विशेष ठेवी मोडण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ठेवी या सिंहस्थासारख्या विशेष कामांसाठीच आहेत. कर्ज काढून सण साजरा करण्यापेक्षा ठेवी मोडून सिंहस्थाचा उत्सव साजरा करणे कधीही चांगले, अशा शब्दांत आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेवी मोडून सिंहस्थकामांसाठी तरतूद करण्याचे समर्थन केले आहे.
सिंहस्थासाठी अंदाजपत्रकातील ठळक बाबी
मखमलाबाद, कामटवाडा झोनकरिता नवीन मलनिस्सारण केंद्र व मलवाहिकांचे जाळे उभारणार
पंचवटीत लक्ष्मीनारायण मंदिरालगत समांतर पूल, रामवाडी ते घारपुरेघाट पर्यंत नवीन पुल उभारणार
बाह्य रिंगरोड, मध्य रिंगरोड, अंतर्गत रिंगरोडसाठी मिसिंग लिंक शोधणार
टीडीआर, एफएसआयच्या माध्यमातून भूसंपादन करणार
पेठ रोडच्या काँक्रिटीकरणासाठी तरतूद
बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करणार
निओ मेट्रोसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
वाहतूक नियोजनासाठी वाहतूक सर्वेक्षण करणार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने तब्बल सात हजार ७६७ कोटींचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्र व राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. शासनाकडून सिंहस्थासाठी किती निधी अनुदान स्वरूपात मिळणार हे अद्याप स्पष्ट नसले, तरी सिंहस्थकामे मात्र आतापासूनच सुरू करावी लागणार असल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकात सिंहस्थकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या २०२४- २५ या आर्थिक वर्षाच्या सुधारित तसेच २०२५- २६ या आर्थिक वर्षाच्या ३,०५४.७० कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला रविवारी (दि. १६) मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकात मंजूर होणाऱ्या सिंहस्थ आराखड्यातील कामांसाठी महापालिकेच्या हिश्श्यापोटी २०२४-२५ मध्ये २२५ कोटी व २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी अशी एकूण ४२५ काटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामे परंतु सिंहस्थासाठी आवश्यक व पूरक असणाऱ्या कामांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या विकासकामांसाठी १२५ कोटींच्या प्राकलनांकरिता ५ कोटींची टोकन तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या उपलब्धतेसाठी महापालिका २०० कोटींच्या ठेवी मोडणार आहे.
मागील सिंहस्थात विकासकामांसाठी कर्ज काढण्यात आले होते. यंदा मात्र कर्ज न काढता असलेल्या ठेवी मोडून सिंहस्थकामांसाठी तरतूद उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज काढून सण साजरा करण्यापेक्षा पदरी सांभाळून ठेवलेला पैसा खर्च करणे कधीही चांगले.
मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका.