Nashik Simhastha -300 किमीपेक्षा अधिक 'ओएफसी नेटवर्क'

सिंहस्थात गर्दी, वाहतूक व्यवस्थापनासह आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा; सीसीटीव्हींची नजर
cctv
cctv file photo
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा उभारणार आहेत. या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३०० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) नेटवर्कच्या माध्यमातून कुंभमेळा काळात प्रशासनाला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.

नाशिक शहरातील विविध प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे जोडण्यासाठी तीन कमांड व नियंत्रण केंद्रांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यामध्ये नाशिक स्मार्ट सिटी कार्यालय, पोलिस आयुक्तालय तसेच महापालिका कार्यालयातील नियंत्रण यंत्रणांचा समावेश असेल. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्र नवीन एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणार आहे. गर्दी, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांवर या केंद्रातून लक्ष ठेवणार आहे.

सिंहस्थ काळात मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात चार हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. बुलेट, फिक्स्ड बॉक्स, एएनपीआर आणि पीटीझेड प्रकारच्या कॅमेऱ्यांद्वारे गर्दीची स्थिती, वाहतुकीची हालचाल आणि संशयास्पद घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे. आपत्कालीन घटना घडल्यास तिची माहिती नियंत्रण केंद्रापर्यंत तातडीने पोहोचवून संबंधित यंत्रणेला तत्काळ कार्यवाही करता येईल.

या माध्यमातून डिजिटल निगराणी, नियंत्रण केंद्रे आणि विविध विभागांमधील समन्वयामुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक गतिमान होण्याची अपेक्षा असून, कुंभमेळ्यानंतरही या डिजिटल सुविधांचा वापर सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी करता येणार आहे.

सीसीटीव्हीसाठी सुमारे ३७१.७० कोटी रुपये खर्च

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये चार हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभारणार आहेत. बुलेट, फिक्स्ड बॉक्स, एएनपीआर आणि पीटीझेड कॅमेऱ्यांचा यामध्ये समावेश असून, या प्रकल्पासाठी सुमारे ३७१.७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

'ओएफसी नेटवर्क'साठी सुमारे १२८.९८ कोटी

नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील डिजिटल यंत्रणांना जोडण्यासाठी ३०० किलोमीटरपेक्षा अधिक 'ओएफसी नेटवर्क' उभारणार आहे. सुमारे १२८.९८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात एचडीपीई डक्ट, नेटवर्क मॉनिटरिंग व ऑपरेशन्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म, फायबर पॅच कॉर्ड आणि राउटर मार्कर यांसारख्या सुविधांचा समावेश असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news