Gold Silver price | चांदीची ऐतिहासिक घसरण 42 हजारांनी स्वस्त

सोने 10 हजारांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा
Gold Silver price
Gold Silver price | चांदीची ऐतिहासिक घसरण 42 हजारांनी स्वस्त
Published on
Updated on

नाशिक : विक्रमी 44 हजारांची वाढ नोंदवीत चांदीने गुरुवारी (दि. 29) चार लाखांचा टप्पा दिमाखात पार केला होता. मात्र, शुक्रवारी चांदी 42 हजारांनी घसरल्याने, चार लाखांच्या खाली आली आहे. दुसरीकडे, 24 कॅरेट सोनेही तब्बल 10 हजारांनी स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.

जागतिक घडामोडींमुळे सराफ बाजारात दररोज मोठी उलथापालथ नोंदविली जात आहे. विशेषत:, चांदीचे दर सातत्याने वर-खाली होत आहेत. जानेवारीतच चांदीने चार लाखांचा टप्पा गाठल्याने, वर्षअखेरीस चांदीचे दर काय असतील, याचा अंदाज बांधणे अवघड होत आहे. चांदीने चालू महिन्यातच तीन आणि चार लाखांचा टप्पा पार करीत वेगळा विक्रम नोंदविला आहे. गुरुवारी चांदीने प्रतिकिलो जीएसटीसह 4 लाख 24 हजार 360 रुपयांचा दर नोंदवीत नवा उच्चांक गाठला होता. शुक्रवारी चांदी 42 हजारांनी गडगडल्याने, पुन्हा एकदा चार लाखांच्या खाली आली आहे. दुसरीकडे, दोन लाखांच्या टप्प्याकडे आगेकूच करणार्‍या सोन्यातही शुक्रवारी मोठी घसरण नोंदविली गेली. गुरुवारी 24 कॅरेट सोने जीएसटीसह 1 लाख 83 हजार 440 रुपयांवर होते. शुक्रवारी त्यात दहा हजारांची घसरण झाल्याने, प्रतितोळा जीएसटीसह 1 लाख 73 हजार 40 रुपयांवर आले आहे. ही घसरण सर्वसामान्यांसाठी काही अंशी दिलासादायक असली, तरी गुंतवणूकदारांना धक्का देणारी ठरली आहे.

कोल्हापुरात सोने 11 हजार, तर चांदी 40 हजारांनी घसरली!

कोल्हापूर : काही महिन्यांपासून ऐतिहासिक उच्चांकाकडे धावणार्‍या सोन्या-चांदीच्या दरवाढीला शुक्रवारी मोठा ब—ेक लागला. गुरुवारी सोन्याने 1.84 लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात दरात मोठी पडझड पाहायला मिळाली. दिवसाच्या एका टप्प्यावर तर सोन्यात 25 हजार आणि चांदीत 85 हजार रुपयांपर्यंतची प्रचंड घसरण झाली होती. मात्र, सायंकाळच्या सत्रात बाजार सावरल्याने सोन्यात 11 हजार, तर चांदीत 40 हजार रुपयांची अंतिम घट नोंदवली गेली. शुक्रवारी वायदा बाजार (कमोडिटी मार्केट) उघडल्यापासून अस्थिरता होती. सायंकाळी 6.30 च्या सुमारास सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 73 हजार रुपये (जीएसटी वगळून) इतके नोंदवले गेले. गुरुवारी हेच दर 1 लाख 84 हजार रुपयांवर होते, म्हणजेच एका दिवसात सोन्यात 11 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीच्या बाबतीतही हेच चित्र होते. गुरुवारी 4.10 लाखांवर पोहोचलेली चांदी शुक्रवारी 3 लाख 70 हजार रुपये प्रतिकिलो (जीएसटी वगळून) या पातळीवर आली आहे. म्हणजेच चांदीच्या दरात 40 हजार रुपयांची मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे, वायदे बाजारात दिवसभरात चांदी 85 हजारांनी कोसळली होती; पण नंतर 45 हजारांची सुधारणा होऊन तो फरक 40 हजारांवर आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news