

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भगवान महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला गुरुवार (दि. १३) पासून सुरुवात झाली. श्रावण मासारंभाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींना सुरुवात झाल्याने परिसर भक्तिमय झाला होता.
पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिर, नारोशंकर मंदिर, गंगापूर परिसरातील श्री सोमेश्वर महादेव मंदिर या प्रमुख शिवालयांमध्ये भाविकांनी दर्शन घेतले. शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र, फुले अर्पण करत भक्तांनी 'ॐ नमः शिवाय'चा जप केला. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने आगामी काळात मंदिरांमधील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यंदा १७, २४, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर असे चार श्रावणी सोमवार आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली असून, १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य मिळणार आहे.
श्रावणाच्या आगमनाने नाशिकच्या धार्मिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, पुढील महिनाभर विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, अभिषेक आणि पूजाविधींची रेलचेल पाहायला मिळणार आहे. शहरातील शिवालयांमध्ये सकाळपासूनच उमटणारा घंटानाद आणि 'हर हर महादेव'चा जयघोष श्रावणाच्या भक्तिमय पर्वाची सुरुवात अधोरेखित करत आहे.