

नाशिक : मतदार यादीत धक्कादायक प्रकार समोर येताना सिडको येथील अर्जुन उत्तम काळे (४५) हे जिवंत असताना त्यांना मृत दाखवत त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. ते स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून त्यांनी मतदार यादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
काळे यांचे २०२४ च्या मतदारयादीत भाग क्र. ३०५, अनुक्रमांक १०९० वर नाव नोंदलेले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. मात्र २०२५ ची मतदारयादी तपासताना त्यांचे नाव गायब असल्याचे आढळले. त्यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असता 'आमचा संबंध नाही' असे सांगून जबाबदारी झटकली होती. त्यानंतर काळे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या नावावर फॉर्म ७ भरून चुकीचा मोबाईल नंबर टाकत त्यांच्या नावाला मृत्यू दाखला जोडण्यात आला होता. तपासात मृत्यू झालेली व्यक्ती मखमलाबाद येथील असून त्यांचे नावही हेच आहे. पण आई, वडिलांचे नाव वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काळे हे महापालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार गमावण्याच्या स्थितीत आले आहे. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हा प्रकार गंभीर आहे. संबंधित व्यक्तीच्या नावावर मृत्यू दाखला कसा जोडला याची चौकशी सुरू आहे. यात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दोषी ठरल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक