Sudhakar Badgujar, Vasant Gite
ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, वसंत गितेंची उमेदवारी जाहीर

Shivsena UBT | ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, वसंत गितेंची उमेदवारी जाहीर

महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीतही मिठाचा खडा
Published on

नाशिक : 'राष्ट्रवादी'च्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केल्यानंतर महायुतीत तणाव वाढला असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिक पश्चिम मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, तर नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी देण्याचा ठराव मंजूर केल्याने महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार असून, अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित यश लाभले. यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी चमकदार कामगिरी करेल, राज्यात सत्ता परिवर्तन घडेल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र एकमेकांच्या मतदारसंघावर आघाडीचे घटकपक्ष दावा ठोकू लागल्याने अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचाच पहिला अंक ठाकरे गटाच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सादर झाला. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित झाले नसताना गुरूवारी (दि. १) गंगापूररोडवरील गुप्ता लॉन्स येथे ठाकरे गटाची बैठक पार पडली. त्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते यांनी लढवण्याचा निर्धार केला गेला. या दोघांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. हा ठराव पक्षप्रमुखांना पाठविला जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवारी जाहीर केली गेल्याने महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.


Sudhakar Badgujar, Vasant Gite
Uddhav Thackeray | धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

मित्रपक्षांच्या दाव्यांमुळे उमेदवारी घोषित करण्याची घाई

ठाकरे गटाने उमेदवारी घोषित करण्यामागे मित्रपक्षांकडून केल्या जाणारे परस्पर दावे कारणीभूत असल्याची चर्चा ठाकरे गटात आहे. नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून गत विधानसभा निवडणुकीत डॉ. हेमलता पाटील यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. आताही काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. तर नाशिक पश्चिम मतदारसंघातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने उमेदवारीचा ठराव करत मतदारसंघात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे माझ्या नावाचा, तर मध्य विधानसभा मतदारसंघातून वसंत गिते यांना उमेदवारी देण्याचा ठराव झाला आहे. अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील.

- सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news