नाशिक : खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांवरील अन्यायामुळे महाराष्ट्र जळत असताना समाजासमाजांत जाती-धर्मांमध्ये वाद निर्माण करून एकमेकांविरोधात विष पेरून सत्तेची पोळी भाजण्याचे षड्यंत्र भाजपकडून सुरू आहे. 'तोडा फोडा राज्य करा' हा इंग्रजांचा मूलमंत्र भाजपने अंगीकारला असून, यामुळे वाढलेल्या भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारीने महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे. सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्रावरील भाजपचे हे मोगलाई आक्रमण उधळून लावण्यासाठी वज्रमूठ उभारा, असे आवाहन शिवसेना (उबाठा)चे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 'एसंशी'ने महाराष्ट्र लूटल्याचा घणाघाती आरोप करत एकनाथ शिंदेंवरही ठाकरे यांनी शरसंधान साधले.
नाशिकमधील गोविंदनगर परिसरातील मनोहर गार्डन येथे शिवसेने(उबाठा)च्या निर्धार शिबिराचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'महाराष्ट्र कुठे चाललाय?' या विषयावर भाष्य करताना ठाकरे यांनी भाजपसह महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, महायुती सरकारच्या १०० दिनपूर्तीचा 'हनिमून पीरियड' नुकताच संपला. मात्र या कालावधीत एकही लोकहिताचा निर्णय सरकारने घेतला नाही. महिला, शेतकरी, युवा असो वा सर्वसामान्य नागरिक एकही नवी योजना सुरू झाली नाही. लाडक्या बहिणींना २१०० तर सोडाच पण, ५०० रुपयेदेखील मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची, सातबारा कोरा करण्याची घोषणा हवेत विरली. गेंड्याच्या कातडीच्या, राक्षसी मनोवृत्तीच्या या सरकारला महाराष्ट्रीय जनतेशी काहीही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात सर्वसामान्य माणूस लुटला जात असताना गृहमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करणे हा मोठा गुन्हा आहे, असे नमूद करत राज्याला अकार्यक्षम गृहमंत्री लाभल्याची टीका ठाकरे यांनी केली.
अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी बेजार झाला असताना कृषिमंत्री शेतकऱ्यांची थट्टा करतात. विकास बाजूला सारून पालकमंत्रिपदावरून महायुतीत भांडण सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याकडेही डोळेझाक केली जात आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक पुसण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, विनायक परब, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, खा. राजाभाऊ वाजे, उपनेते सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, बबन घोलप, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, वसंत गिते, विनायक पांडे, बाळासाहेब पाठक आदी उपस्थित होते.
सत्तेसाठी विविध जाती-धर्मांमध्ये भांडणे लावणाऱ्या भाजपकडून देशाची अंतर्गत फाळणी करण्याचा धोकाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली स्किल इंडिया, मेक इन इंडिया, इनक्रिडिबल इंडियाची आश्वासनपूर्ती भाजपने केली नाही. 'अच्छे दिन' बघायला मिळालेच नाहीत. भ्रष्टाचारमुक्त भारताची हाक देणाऱ्या भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत मंत्री बनवले. २०१९ च्या निवडणुकीत देशभक्तीची हाक देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या आक्रमणाविरोधात बोलायला तयार नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत हिंदुत्वाचा नारा दिला गेला. आता हिंदुत्वही धोक्यात आले आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांचे शिबिरस्थळी आगमन होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. ठाकरे यांच्या सत्कारासाठी व्यासपीठावर उबाठा पदाधिकाऱ्यांची एकच गर्दी उसळली. प्रत्येकजण ठाकरे यांच्या सत्कारासाठी आसुसलेला होता. मात्र या गर्दीमुळे व्यासपीठ खचले. कर्रर्रर्रर्र..कच असा मोठा आवाज होताच आयोजकांनी व्यासपीठावरील गर्दी कमी केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.