नाशिक : हिंदूंशी कोणताही संबंध नसल्या कारणाने आम्ही वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला. आमच्यासोबतच सदर विधेयक अण्णा द्रमुकने देखील नाकारले. तथापि, दोनच दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूत जाऊन त्यांच्याशी युती जाहीर केली. त्यामुळे आमच्या हिंदुत्वाच्या भूूमिकेवर कोणत्या तोंडाने आरोप करता, असा थेट सवाल करत 'भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे' हाच फेक नरेटिव्ह असल्याची घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
आमचे हिंदुत्व राष्ट्रवादी स्वरूपाचे तर भाजपचे बुरसटले आहे. प्रसंगी मरण पत्करेन पण हिंदुत्व सोडणार नाही असा निर्धार व्यक्त करीत, आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नाही, असेही ठाकरे यांनी ठासून सांगितले. भाजपने महाराष्ट्रात ईव्हीएमच्या जोरावर विजय मिळवला असून, हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आव्हानही शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील निर्धार शिबिराप्रसंगी सत्ताधाऱ्यांना दिले.
नाशिकमधील मनोहर गार्डन येथे आयोजित पक्षाच्या निर्धार शिबिर समारोपप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या शिवसैनिकांना आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी उभारी देताना ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, चार दिवसांपूर्वी रायगडावर बोलताना अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेऊ नका, असे सांगितले. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरत लुटली त्यावेळची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे अमित शाह शिवाजी महाराजांचा वारंवार एकेरी उल्लेख करत असताना गप्प बसून होते, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी बोंब मारणाऱ्या भाजपने बिहारमध्ये 'सौगात ए मोदी'च्या माध्यमातून 32 लाख मुस्लिमांना भेटीचं वाटप केले. त्यावेळी तुमचे हिंदुत्व कुठे गेले? म्हणजे महाराष्ट्रामध्ये 'बटेंगे तो कटेंगे' आणि बिहारमध्ये 'बाटेंगे तो जितेंगे' असे यांचे धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले त्यामुळेच हे घाबरले. हिंदुत्व जपणारा हा महाराष्ट्र धर्म आहे. आम्ही 'जय श्रीराम' बोलणार, पण तुम्हाला ‘जय शिवराय’, ‘जय भीम, जय महाराष्ट्र’ बोलावे लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी हे काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करून दाखवावा, असे म्हणत असतील तर मग भाजपनेही दलित व्यक्तीला सरसंघचालक करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
भाजपच्या मोगलाई आक्रमणापासून महाराष्ट्राला जपण्यासाठी माझ्यासोबत या. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दाखविली हा इतिहास आहे. ती दिशा दाखविण्याची वेळ आता पुन्हा एकदा आली आहे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, खा. राजाभाऊ वाजे, उपनेते बबन घोलप, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब पाठक, वसंत गिते, विनायक पांडे, शुभांगी पाटील, भारती ताजनपुरे आदी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांबद्दल भाजपची भूमिका ढोंगी असल्याची टीका करत अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, 'नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी समुद्रात भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने आम्हालाही वाटत होते की स्मारक होईल. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे कोणीच असू शकत नाही. उदयनराजे म्हणाले ते खरे आहे. राजभवनात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारा, असेही ठाकरे यांनी सांगितले.
लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण अशी भाजप नेत्यांची अवस्था असल्याचे नमूद करत अमित शाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढाच आदर असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुटी जाहीर करावी, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नरसंहार घडविला. भाजपची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
दत्तक नाशिकची घोषणा करणाऱ्या तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार शरसंधान साधले. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक पालकमंत्र्यांविना बेवारस का पडले? दत्तक नाशिकची दूरवस्था का झाली, असा सवाल ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाली होती. गेल्या पाच वर्षात स्मार्ट प्रकल्पावर १९४३ कोटी रुपये खर्च होऊन देखील नाशिक स्मार्ट का झाले नाही, हा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा सवालही त्यांनी केला.