

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पाठोपाठ शिवसेना शिंदे गटही सक्रीय झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.५) सायंकाळी सात वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली असून विरोधकांसह मित्रपक्षांनाही बळ दाखविण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार आहे.
महापालिका, जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायती तर तिसऱ्या टप्प्यात जानेवारी अखेरीस महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकांसाठी जोर लावला आहे.
भाजपने महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला असून त्यासाठी अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू केले आहे. शिवसेना शिंदे गटही मागे नाही, शिंदे गटानेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात उत्तर महाराष्ट्राचा मेळावा घेण्यात आला. पाठोपाठ आता नाशिकमध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गट राज्याच्या सत्तेत असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली जाणार असल्याची चर्चा आहे.