

नाशिक : महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी 'त्या' व्यापाऱ्याने शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणवून घेणारे फितूर आणि गद्दार निघाले. एक साथ दिल्लीपुढे मुजरे घालत आहेत. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी निर्माण केली होती. पण, ते गद्दार होते, ते गेले. त्यांना पैसा, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या मिळाल्या. मात्र, इतिहासात तुमची नोंद फितूर आणि गद्दार म्हणूनच राहणार आहे. गंगेत कितीही डुबक्या मारल्या, तरी गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही अशा शब्दात 'एआय'च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या आवाजात बाळासाहेब ठाकरे भाजप आणि शिंदेसेनेवर बरसले. बाळासाहेबांचा आवाज ऐकुण उपस्थितीत शिवसैनिकांमध्ये मात्र स्फुरण चढल्याचे दिसून आले.
शिवसेना ठाकरे गटातर्फे मनोहर गार्डन येथे आयोजित विभागीय मेळाव्यात 'एआय'च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाची चित्रफित प्रसारित करण्यात आली. ठाकरे शैलीत राज्याच्या स्थितीसह शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीवर त्यात भाष्य केले गेले. भाजपचा समाचार घेताना बाळासाहेब म्हणाले, आम्ही त्यांना आधार दिला. त्यांना मोठे केले. आता मात्र त्यांना खांदा देण्याची वेळ आली आहे. २५ वर्षे आमचे त्यांच्याशी नाते होते. अर्थात हिंदुत्व माणून. महाराष्ट्रात शिवसेनेवरच ते वाढले. मग नाते कोणी तोडले? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी असून, हळूहळू त्या काढतो.
गेल्या विधानसभा निवडणूकीत काय झाले, जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे काय? गिते, बडगुजर, अनिल कदम, योगेश घोलप, अद्वय हिरे, अनिल गोटे मैदानात होते. पण निकाल उलटे लागले. भाजप आणि नकली शिवसेनावाल्यांनी काय दिवे लावले की, ज्यांना अशी भरभरून मते पडली. लोकशाहीत असे जबरदस्तीने निकाल लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य? ही लोकशाही आम्ही मान्य करणार नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल. मी सावरकरांच्या मातीत बोलतो. टाका एक खटला माझ्यावर. नाही तरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकता ना. सगळा पैशांचा खेळ आहे. महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला होता तेवढाच भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटत आहेत. ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली. भाजपला आम्ही हिंदुत्वासाठीच सोबत घेतले. मोठे केले. आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच भाजपवाले आहेत. हिंदु-हिंदुमध्ये भांडणे लावून नाना फडणवीस मजा बघत आहेत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी, शिवसेनेचे अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही, असा घणाघातही करण्यात आला.
महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. नाशिकमध्ये अवकाळीने माझा शेतकरी गार झाला आहे. कर्जाचा डोंगर घेवून माझा शेतकरी जगतो. जगतोय कसला रोज आत्महत्या करतो. कृषीमंत्री कोकाटे मात्र, कोकणात फिरतायत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार होता ना? मग शेपुट का घालता, लाज नाही वाटत. रोजगार नाही, आरोग्यसेवेचे धिंडवडे निघत आहेत. नाशिकमध्ये किती नवीन उद्योग आले? तर भोपळा आला, असेही एआय भाषणात बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
आहेत ना सर्व जमीनीवर. बबन घोलप कुठे आहे. दिसतोय ना, जागेवर आहे ना! असे कुठे भरकटता इकडे-तिकडे. अरे बाबानो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. आज जो समोर साधा शिवसैनिक बसला आहे तो महत्त्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार-खासदार बनविले. बातम्या सुरूच आहेत. हा गेला, तो गेला. अस्वलाच्या अंगावरील दोन-चार केस उपटले काय फरक पडतो, अशा शब्दात एआय भाषणात पडझडीवर मत व्यक्त केले गेले. नाशिकचे गोल्फ मैदान गाजवले आहे. पैसे देवून सभेला आणण्याचा दळभद्री प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नसल्याचेही बाळासाहेब म्हणाले.