

नाशिक : शिवसेना (उबाठा) ला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या विलास शिंदे यांना अखेर संपर्कप्रमुख पदाच्या रूपाने बक्षिसी मिळाली. पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांची नाशिकच्या संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती केली.
विलास शिंदे हे उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख आहेत. उबाठामध्ये त्यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक, पदाधिकारी नाराज असल्याची स्पष्टोक्ती तत्कालीन उपनेते सुधाकर बडगुजर यांनी केल्यानंतर बडगुजर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. कालांतराने बडगुजर यांचा दावा खरा ठरला. एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्या कुटुंबातील लग्नाला हजेरी लावल्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा सूचक इशारा दिला होता.
त्यानंतर आठवडाभरातच विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. त्यावेळी विलास शिंदे यांच्याकडे पक्षाने कुठलीही जबाबदारी सोपविलेली नव्हती. आता त्यांची पक्षाच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी दीर्घकाळ पक्ष संघटन, जनआंदोलन आणि सामाजिक कार्यात आपली वेगळी छाप उमटवली आहे. नेतृत्वगुण आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे शिवसेना पक्षात शाखाप्रमुख पदापासून सुरुवात करत त्यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवक, सभापती तसेच गटनेता या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. संपर्कप्रमुख पदावरील शिंदे यांच्या नियुक्तीने नाशिक जिल्ह्यातील शिवसेना संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि जनआकर्षक होईल, असा विश्वास पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
विश्वास सार्थ ठरविणार - पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपली संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करत विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार. पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटन वाढीसाठी काम केले जाईल. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी काम उभे केले जाईल.
विलास शिंदे, संपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट, नाशिक