

नाशिक : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा काढण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बुधवारी (दि.19) शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा काढण्याबाबत सूचित केले आहे.
केंद्राच्या सूचनांनूसार यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छत्रपतींच्या जीवनावर मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. नाशिक शहरातील मराठा हायस्कूल आणि एकलव्य शाळेचे एकूण १००० ते १२०० विद्यार्थी सकाळी 7.30 वाजता मराठा हायस्कूल, पंडीत कॉलनी, राजीव गांधी भवनमार्गे सीबीएस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशोकस्तंभ मार्गे पुन्हा केटीएचएम कॉलेज बसस्टॉप अशी पदयात्रा काढणार आहेत. यावेळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, छत्रपतींच्या पोशाखात घोड्यावर स्वार झालेले वीर शिवाजी देखील पदयात्रेत सामील होणार आहे. जिल्हा प्रशासनासह इतर शासकीय विभाग पदयात्रेत सहभागी होणार असून स्थानिक शाळा, कॉलेज, क्रीडा असोसिएशन व क्रीडा संस्था, क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंच्या सहाय्याने क्रीडा विषयक प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. ढोल-ताशा, लेझीम, पांरपरिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, योगा, मल्लखांब, पारंपरिक व ऐतिहासिक बाबींचा या पथकांचा यात समावेश असणार आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे सकाळी 8 वाजता पुष्पहार अर्पण करून शिवपूजन करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
राष्ट्राच्या व राज्याच्या शाश्वत विकासात युवकांचे योगदान मोलाचे आहे. युवकांमधील नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्वाचा विकास करताना त्यांना सामाजिक सेवाभाव, शासकीय उपक्रमांची माहिती व सहयोग यांची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवकांच्या संकल्पना जाणून घेणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, आवश्यक असल्याने हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवजयंतीला सकाळी 9 वाजता युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.