

नाशिक : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास १५ ते २० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी सुमारे ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात आरोपींनी संगनमत करत ५१ वर्षीय तक्रारदार व इतर तक्रारदारांना व्हॉट्स पवरून कॉल व मेसेजद्वारे संपर्क साधला. फॉरेक्स व ट्रेडिंग गुंतवणुकीविषयी माहिती दिली. त्यानंतर पाठवलेल्या लिंकद्वारे बनावट ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या ॲपद्वारे फॉरेक्स ट्रेडिंग करत असल्याचे भासवून नमूद ट्रेडिंगद्वारे महिन्याला १५ ते २० टक्के नफा होईल, असे आमिष दाखवले.
त्यासाठी बँक खात्यांत २७ लाख ९४ हजार ७४ रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. दुसऱ्या तक्रारदारांना सुद्धा वेगवेगळ्या क्रमांकावरुन अज्ञात आरोपींनी संपर्क साधला. त्यांनाही शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत बनावट प्लॅटफॉर्मद्वारे २९ लाख ८८ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली. दोन्ही तक्रारदारांची एकूण ५७ लाख ८२ हजार ७४ रुपयांची फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले बँक खाते, वॉलेट खाते व वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पिसे तपास करत आहे.