नाशिक : १९८५ मधील निवडणुकीनंतर आजवर विधानसभेत कोणत्याही राजकीय पक्षाची एकहाती सत्ता आली नाही, हे मतदारांच्या जागरूकतेचे द्योतक म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सबल, सुदृढ विरोधी पक्ष असण्यावाचून तरणोपाय नाही, याचा वस्तुपाठ मराठी मुलखाने दिल्याचेही यानिमित्त म्हणता येईल. सत्ताधाऱ्यांना एकहाती काैल दिल्याची नानाविध उदाहरणे राज्याने अनुभवली आहेत; तथापि, विरोधकांना जिल्ह्यातील सर्व 14 जागा पदरात टाकण्याचा चमत्कार नाशिक जिल्ह्याने 40 वर्षांपूर्वी अनुभवला, हे उदाहरण मात्र दुर्मीळच म्हणावे लागेल.
राज्यातील मतदारांची नाळ काँग्रेस पक्षाशी जोडली गेलेली असताना ती तोडण्याचा जादूई प्रयोग तत्कालीन समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची लाट दिसून आल्याने महाराष्ट्रातील विधानसभेतही त्याची प्रचिती येण्याची दाट शक्यता होती. मात्र, पवारांच्या पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) प्रयोगाने राज्यात काँग्रेसची घोडदौड रोखली गेली. पवारांनी स्वत:च्या समाजवादी काँग्रेससह भाजप, जनता पक्ष, माकप, भाकप, शेकाप आदी पक्षांची मोट बांधून पुलोद प्रयोग यशस्वी केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली असली, तरी पुलोदच्या माध्यमातून प्रबळ विरोधी पक्षही जन्माला आला, हे विशेष.
40 वर्षांपूर्वी शरद पवार यांचा शब्द नाशिक जिल्ह्यात प्रमाण मानला जात असे. याच अनुषंगाने १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत पवारांनी जिल्ह्यात संतुलित जागावाटप करून सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे करण्याचा चंग बांधला. जाहीर झालेले निवडणूक निकाल सत्ताधाऱ्यांचे डोळे पांढरे करणारे आणि विरोधकांचा उर भरून येणारे ठरले. जिल्ह्यातील सर्व 14 जागी पुलोद उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. जि. प. मैदानावर शरद पवार यांच्या हस्ते आणि अलोट गर्दीच्या साक्षीने नवनिर्वाचित आमदारांचा झालेला सत्कार सोहळा अविस्मरणीयतेची मोहोर उमटवून गेला.
तत्कालीन परिस्थितीत सामान्यांना उमेदवारी देऊन निवडून आणणे फार कसरतीचे नसल्याने शरद पवार यांनी आपल्या कौशल्याने ऐनवेळी नवे चेहरे शोधून त्यांना मैदानात उतरवले होते. बागलाणमध्ये निवडून आलेले रुंझा गांगुर्डे हे तर एसटी कंडक्टर होते. याशिवाय, बऱ्याच जणांचा जनतेला परिचय नसतानाही त्यांना पुलोद प्रयोगामुळे विधिमंडळ गाठता आले. निवडून आलेले उमेदवार हे होते :
नाशिक : डॉ. दौलतराव आहेर (भाजप), देवळाली : भिकचंद दोंदे (भाजप), सिन्नर : तुकाराम दिघोळे (समाजवादी काँग्रेस), दिंडोरी : हरिभाऊ महाले (जनता पक्ष), बागलाण : रुंझा गांगुर्डे (समाजवादी काँग्रेस), कळवण : काशीनाथ बहिरम (समाजवादी काँग्रेस), निफाड : मालोजीराव मोगल (समाजवादी काँग्रेस), इगतपुरी : शिवराम झाेले (समाजवादी काँग्रेस), नांदगाव : माधवराव गायकवाड (माकप), चांदवड : जयचंद कासलीवाल (भाजप), येवला : मारोतराव पवार (समाजवादी काँग्रेस), सुरगाणा : जे. पी. गावित (माकप), मालेगाव : निहाल अहमद (जनता पक्ष), दाभाडी : पुष्पाताई हिरे (समाजवादी काँग्रेस)