

Severe house fire due to short circuit
पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवाः वीड तालुक्यातील पिंपळनेर येथील खाटीक गल्ली परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जमीर कुरेशी यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किचनमधील फ्रिजमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच या आगीने विक्राळ रूप धारण केले आणि किचनमधून संपूर्ण घरात धूर व ज्वाळांनी तांडव पसरला. घरातील कपाटात ठेवलेली तब्बल २,६०,००० रोख रक्कम तसेच इतर महत्त्वाचे घरगुती साहित्य पूर्णतः नष्ट झाले, असे जमीर कुरेशी यांनी सांगितले.
आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तत्परतेने धाव घेतली व जवळील बोरवेल सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने मोठे स्वरूप धारण केल्यामुळे आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर महसूल मंडळ अधिकारी सचिन सानप व तलाठी अभिषेक ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला. सदर प्रकरणी पंचनामा करून वरिष्ठांना प्रथम अहवाल पाठविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जमीर कुरेशी यांनी महसूल विभाग तसेच महावितरण यांच्याकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
पिंपळनेर मध्ये शॉर्टसर्किट लागलेल्या आगीत कुरेशी जमीर यांच्या घरातील संसार उपयोग साहित्य जळून खाक दिसत आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी जमीर कुरेशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे करून मदत दिली आहे.