

नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सीमा हिरे Seema Hiray यांच्याविरोधात स्वपक्षातील इच्छुकांनीच बंड पुकारले आहे. हिरे विरोधकांनी गुरुवारी(दि.१७) सातपूरमध्ये बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.१८) थेट भाजप कार्यालयात धाव घेत शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या दालनात ठिय्या मांडला. हिरे यांना या मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यास पक्षाचा पराभव होईल, असा इशाराच या इच्छुकांनी दिल्याने पक्षाची कोंडी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान बनल्या आहेत. उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. हरियाणा निवडणुकीतील यशानंतर भाजपच्या इच्छुकांना जोर चढला आहे. भाजपच्या उमेदवारीवर इच्छुकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. त्याचाच पुढील अंक नाशिक पश्चिम मतदारसंघात सादर होताना दिसत आहे. या मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपत मोठा कलह निर्माण झाला आहे. पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार हिरे यांच्यासह माजी सभागृहनेते दिनकर पाटील, धनंजय बेळे, शशिकांत जाधव, बाळासाहेब पाटील, मुकेश शहाणे, दिलीप भामरे, जगन पाटील, विक्रम नागरे, डझनभर इच्छुक आहेत. हे सर्व इच्छुक आ. हिरेंविरोधात एकवटले आहेत. गुरुवारी या इच्छुकांनी सातपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेत, आ.हिरेंच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर शुक्रवारी या नाराजांनी थेट भाजपच्या 'वसंतस्मृती' कार्यालयात धाव घेत, शहराध्यक्ष जाधव यांच्या समोर ठिय्या मांडत आ.हिरेंविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला.
आ.हिरेंना उमेदवारी देऊ नका. गेल्या १० वर्षांत मतदारसंघात कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे मतदार नाराज असून, आ.हिरेंना उमेदवारी दिली तर, भाजप पराभूत होईल असा दावा या नाराजांनी शहराध्यक्षांकडे केला. त्यामुळे नाशिक पश्चिमच्या उमेदवारीवरून भाजपची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.
शहराध्यक्ष जाधव यांच्यासमोर हिरेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर या इच्छुकांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण हिरेंना नको, अशी भूमिका या नाराजांनी घेतली. यावेळी तुमच्यापैकी कुणाच्या नावावर एकमत आहे, असे पत्रकारांनी विचारले असता प्रत्येकाने स्वत:चेच नाव सांगण्याचा प्रत्यन केला. माध्यमांसमोर गटबाजी उघड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हिरेंना उमेदवारी नको, अन्यथा आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ, असा इशारा या इच्छुकांनी दिला.
विद्यमान आमदारांच्या कारभाराविषयी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. पक्षाचे हित लक्षात घेता उमेदवार बदलावा, अशी आमची मागणी आहे.
- दिनकर पाटील, इच्छुक उमेदवार, भाजप
गेल्या १० वर्षांत पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. उमेदवारीसाठी कोणीही इच्छुक असू शकते. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य राहील.
- सीमा हिरे, आमदार, भाजप