

नाशिक : माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवाविरोधात दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पोलिस यंत्रणेकडून गोपनीय स्वरूपात तपास सुरू आहे. भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील याच्यासह आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या माजी केंद्रीय मंत्री दानवे यांच्या नातवाविरोधात भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे. कैलास अहिरे यांनी माध्यमांसमोर “या व्यवहारासाठी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीच मध्यस्थी केली होती.” असा थेट दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास अहिरे यांनी आपल्या कंपनीत रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना १४ टक्के शेअर भागीदारी दिली होती. या भागीदारीसाठी २५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र त्यापैकी १० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप अहिरे यांनी केला आहे.
अहिरे यांच्या माहितीनुसार, २०१८ साली मुंबईत त्यांची रावसाहेब दानवे यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी दानवे यांनी, “मी मंत्री आहे. तुझ्या कंपनीला सरकारी कामे मिळवून देतो आणि टर्नओव्हर शेकडो कोटींवर नेतो,” असे सांगत आपल्या नातवाला भागीदार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या विश्वासावर आपण हा प्रस्ताव मान्य केल्याचा दावा अहिरे यांनी केलेला आहे. सुरुवातीला ५० लाख रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार आहेर यांनी नोंदवली आहे.