नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार यंदा प्रवेशासाठी तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला बुधवारी (दि. ३) पासून सुरुवात झाली.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. ३) पासून अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी शनिवारी (दि. ६) पर्यंत मुदत असेल. यानंतर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये अकरावी प्रवेशासाठी २८ हजार जागा आहेत. त्यापैकी २५ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. पहिल्या फेरीत ६ हजार ९३१ जणांचे प्रवेश निश्चित झाले.
कॅप फेरी जागा : २३ हजार ४४३.
कॅप प्रवेश : ६ हजार ७९.
कोटा जागा : ४ हजार ५५७.
कोटा प्रवेश : ८५२.
अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत- ३ ते ६ जुलै
माहिती विश्लेषणासाठी राखीव मुदत - ७ ते ९ जुलै
दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी- १० जुलै स. १० वाजता.
यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत- १० ते १२ जुलै.