

Dada Bhuse
नाशिक : 'कारणे नको, रिझल्ट हवा, नको ते उद्योग करण्यात वेळ वाया घालू नका', अशी तंबी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिली. हिवाळी गावातील शाळेत कोणी जाऊन आलं का?. हिवाळीतील विद्यार्थी अचंबित करणारे असून एकदा जाऊन बघा, अशी सूचनाही त्यांनी केली. एकूणच शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत भुसे यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला.
मी भाषण द्यायला आलो नाही, माझी विनंती आहे की विद्यार्थी घडवा. मी मनपा शाळेत भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांना वाचता सुद्धा येत नाही, असे सांगत दादा भुसेंनी मनपाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनाही सुनावले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शुक्रवारी (दि. १३) नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.
दादा भुसे यांनी ज्या हिवाळी गावातील शाळेचा उल्लेख केला, त्याविषयी जाणून घेऊ. ही शाळा वर्षातील ३६५ दिवस भरते. ही शाळा रोज बारा तास चालते. हिवाळी गाव नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलपासून ४० किलोमीटरवर अंतरावर आहे. हिवाळी गाव डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. इथली लोकसंख्या अवघी दोनशेच्या जवळपास आहे.
या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना तब्बल ४०० पेक्षा अधिक पाढे तोंडपाठ आहेत. भारतीय संविधानातील सगळीच कलमे पाठ आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग, जगभरातील देशांच्या राजधान्या हेदेखील या शाळेतील विद्यार्थी पुस्तक न पाहता सांगतात. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही हे विद्यार्थी अचूक देतात.