

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर एमआयडीसी परिसरात खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इन्फिनिटी एंटरप्रायझेसचे संचालक आशिष शिनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शर्मा याने सहकाऱ्यांच्या मदतीने तीन लाख रुपयांची खंडणी मागत त्यापैकी ६० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी कुख्यात खंडणीखोर संतोष शर्मा याच्यासह शशी राजपूत, रोहित म्हस्के व कैलास दवंडे यांना या घटनेत आरोपी करण्यात आले आहे. जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ च्या आठवड्यादरम्यान पहिल्या सातपूर एमआयडीसीतील सकाळ सर्कलसमोर असलेल्या इन्फिनिटी एंटरप्रायझेस या कंपनीला लक्ष्य करत संशयितांनी खंडणीची मागणी केली.
आरोपींनी कंपनीविरोधात एमआयडीसी कार्यालयात तक्रार दाखल करत ती मागे घेण्यासाठी दबाव टाकला. कंपनीच्या गेटवर विनापरवाना व अनधिकृतरीत्या 'अतिक्रमण हटवा, एमआयडीसी बचाव' अशा मजकुराचे पोस्टर चिकटवून कंपनीतील कामगारांत असंतोष पसरवण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी कामगारांशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तुमच्या मालकाने पैसे दिले नाही तर आमच्याशी गाठ आहे, अशा धमक्या दिल्या. फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी मागितली.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोपी शर्मा याने कंपनीच्या गेटवर येत 'तुझा गेम करून टाकेन' अशी धमकी देत फिर्यादीकडून ६० हजार रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे आशिष शिनकर यांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संतोष शर्मा व साथीदारांविरुद्ध खंडणी, धमकी व अरेरावीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. याबाबत सातपूर पोलिस तपास करत आहेत.