

नाशिक : कुसुमाजग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार यंदा मराठी रंगभूमीवर गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भरीव योगदान देणारे सर्वात प्रभावशाली आणि प्रगतिशील नाटककार सतीश वसंत आळेकर जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी सोमवारी (दि. २७) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दाेन वर्षांनी जनस्थान पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली दिग्दर्शक विजय केंकरे, कथाकार तथा समीक्षक गणेश मतकरी, कवी गणेश कणाके आणि समीक्षक रेखा इनामदार-साने या सदस्यांच्या निवड समितीने 'जनस्थान पुरस्कार-२०२५' साठी सतीश आळेकर यांची निवड केली. एक लाख रुपये रोख, गौरवचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १० मार्च रोजी कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे
आळेकर हे मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पुण्याच्या थिएटर अकादमीचे संस्थापक सदस्य असून 'महानिर्वाण', 'महापूर', 'अतिरेकी', 'पिढीजात', 'मिकी आणि मेमसाहिब' आणि 'बेगम बर्वे' अशा अनेक नाटकांसाठी ते मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध आहेत. त्यांनी अकादमीसाठी या नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. 'एक दिवस मठाकडे' आणि आता रंगभूमीवर गाजत असलेले 'ठकीशी संवाद' ही दोन अलीकडील नाटके अनुक्रमे निपुण धर्माधिकारी आणि अनुपम बर्वे यांनी दिग्दर्शित केली आहेत. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासमवेत आळेकर हे आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतिशील नाटककार मानले जातात.
पत्रकार परिषदेस डॉ. दिलीप धोंडगे, लोकेश शेवडे, अजय निकम, राजेंद्र ढोकळे, विलास लोणारी आदी उपस्थित होते.