

सटाणा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये येथील निवासी अपंग कल्याण केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी अस्थिव्यंग व बहुविकलांग प्रवर्गात २४ सुवर्णपदके, २३ रौप्यपदके व ३ कांस्यपदके अशी घवघवीत कमाई करून संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक व सक्षम फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा समाजकल्याण विभागीय आयुक्त माधव वाघ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, भरत चौधरी, सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धांमध्ये अस्थिव्यंग व बहुविकलांग प्रवर्गात येथील निवासी अपंग कल्याण केंद्र येथील एकूण ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विविध वयोगटांमध्ये ५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, भरभर चालणे, व्हीलचेअर रेस तसेच बहुविकलांग प्रवर्गात बादलीत वॉल टाकणे, लगोरी फोडणे, २५ मीटर भरभर चालणे आदी खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अस्थिव्यंग प्रवर्गात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १८ सुवर्णपदके व १३ रौप्यपदके अशी एकूण ३१ पदके प्राप्त केली. तसेच बहुविकलांग प्रवर्गात ६ सुवर्णपदके, ५ रौप्यपदके व ३ कांस्यपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या दोन्ही प्रवर्गांचा एकत्रित विचार करता शाळेतील विद्यार्थ्यांनी २४ सुवर्णपदके, २३ रौप्यपदके व ३ कांस्यपदके अशी एकूण ४५ पदकांची घवघवीत कमाई करून विजयाचा जल्लोष साजरा केला. स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी ठरलेल्या (छाया : सुरेश बच्छाव) सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, केंद्राचे अध्यक्ष डॉ. सतीश लुंकड, व्यवस्थापक बाळासाहेब गिरी, शालेय समिती सदस्य श्यामकांत मराठे, प्रवीण सोनवणे, अरुण पवार, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब रौंदळ, मनोज कोठारी, महेश चोपडा आर्दीनी यशस्वी स्पर्धकांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अधीक्षिका सविता गिरी, मुख्याध्यापक अमित कांबळे, डॉ. मुकेश पाटील व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.