

नंदुरबार : योगेंद्र जोशी
रुबाबदार, ऐटदार व जातिवंत अश्वांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील अश्व बाजारात अवघ्या दोन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली. आजच्या अत्यंधुनिक गाड्यांच्या जमान्यातही येथील अश्व बाजार अश्वप्रेमींना येथील चांगलीच भुरळ घालत आहे. अध्यात्म व जातिवंत अश्वांच्या पर्वणीचा अनोखा संगम येथील यात्रेत अनुभवायला मिळत आहे. गुरूवारी (दि.4) श्री दत्त जयंती पासून या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून दोन दिवसांत 40 पेक्षा अधिक घोड्यांची विक्रमी विक्री झाली.
सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्व बाजाराला प्राचीन इतिहास आहे. राजेरजवाड्यांपासून तर हल्लीचे सिनेकलावंत, विदेशी नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते साऱ्यांचीच या बाजारात अश्व पाहणी व खरेदीसाठी हजेरी असते. या बाजारात देशभरातून अश्वप्रेमी दाखल होतात. यामुळे घोडेबाजारात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदाचा अश्व बाजारही चांगलाच भरला असून, आतापर्यंत यात्रेत दोन हजार ८०० घोडे दाखल झाले आहेत. काठेवाड, मारवाड, सिंघ, पंजाब अशा विविध जातींचे घोडे दाखल झालेले आहेत. दररोज घोड्यांची विक्री होत असून विविध प्रांतांतून अश्व विक्रेते आपल्या अश्वांना विक्रीसाठी घेऊन येत आहेत.
प्रारंभीच लाखोंची उलाढाल
एकूण घोडे आवक : २८००
घोडे विक्री संख्या : 40
एकूण विक्री किंमत : 50, ०१, १०० रुपये
घोडी जास्तीत जास्त किंमत: ११,११,१११ रुपये
येथील यात्रेला एक इतिहास आहे. सांस्कृतिक वारसा जतन होऊन रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आहे. यात्रोत्सवात चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अश्वांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरवर्षी यात्रेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न आहे.
जयपाल सिंह रावल, अध्यक्ष, चेतक फेस्टिवल समिती, सारंगखेडा, नंदुरबार
एक कोटी पर्यंतची बोली
घोड्यांच्या शरीरावरील खुणा, रंगांचे ठिपके, खुरांचा प्रकार, नाकाची आणि मानेची ठेवण, कपाळावरील खुणा, कपाळावर रुळणारे केस यावरून ठरणारे शुभ- अशुभ लक्षणं, या सगळ्या गोष्टींची माहिती घेत घोडेबाजारातून फेरफटका मारणाऱ्यांना वेगळीच रंजकता अनुभवायला मिळते. काठीयावाडी, मारवाडी, नुकरा, रेवाल अशा विविध जातीच्या घोड्यांचा यात समावेश असतो. दहा हजारापासून एक कोटी पर्यंतची बोली लावली जाईल अशा विविध प्रकारचे घोडे यंदाही दाखल झाले आहेत.
येथील अश्व बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथे उच्च जातीचे घोडे विक्रीसाठी येतात. यात्रेत दररोज घोड्यांची खरेदी- विक्री होते. यात्रा काळात अश्वांची खरेदी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
अभिजीत पाटील, सभापती, बाजार समिती, शहादा, नंदुरबार
श्रेष्ठता सिद्ध करणाऱ्यांना विशेष मागणी
विविध नृत्य प्रकार करून दाखवणारे घोडे, श्रेष्ठता सिद्ध करणाऱ्या विशिष्ट खुणा शरीरावर असलेले घोडे, नजरेत भरणारी उंची, चमकदार शरीरयष्टी आणि कमालीचा उमदेपणा यामुळे एकाहून एक सुंदर घोडे यात्रेचा आकर्षण बिंदू ठरत आहेत. वेगवेगळ्या जातीच्या घोड्यांमधील श्रेष्ठता समोर आणणाऱ्या अश्वस्पर्धांना देखील यात्रेकरूंनी भरभरून प्रतिसाद असतो. घोड्यांची कर्तब आणि कला गुण बघताना यात्रेकरूंच्या डोळ्यांचे जणू पारणे फिटत आहे.
सिने कलाकारांनाही आकर्षण
पूर्वी या ठिकाणी सुनिल दत्त, फिरोज खान यांच्याबरोबरच शक्ती कपूर, उर्मिला मारतोंडकर यांनीही या ठिकाणी भेट दिलेली आहे. शिवाय छत्रपतींचे वंशज शहाजीराजे भोसले व तत्सम बड्या राजकीय नेत्यांनी देखील येथे यापूर्वी हजेरी लावलेली आहे. यंदा बाजारात पहिल्याच दिवशी दौंड येथील आमदार राहुल कुल यांनी येथून 11 लाख 11 हजार रुपये किमतीचा घोडा खरेदी केला आहे.