

कळवण / सप्तश्रृंगगड : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवास विधिवत सुरुवात झाली. भाविकांनी 'अंबे की जय', 'सप्तशृंगी माता की जय' असा जयघोष करत मंदिर परिसर दणाणून सोडला. या उत्सवाचे केंद्रस्थानी पंचामृत महापूजा व घटस्थापना होती.
उत्सवाची सुरुवात विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून झाली. या सोहळ्याचे उद्घाटन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायधीश अभय लाहोटी यांनी सपत्नीक श्री भगवतीच्या अलंकारांचे पूजन करून केले. पूजनानंतर देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणूक मंदिरात पोहोचवल्यानंतर देवीच्या उत्सव मूर्तीवर पंचामृताने विधिवत अभिषेक करण्यात आला.
पहिल्या माळेला श्री भगवतीस पांढऱ्या रंगाचे भरजरीचे पेठणी महावस्त्र नेसविले गेले. सांजशृंगारानंतर देवीला शोभायमान अलंकार परिधान करून सजवण्यात आले. या अलंकारात डायमंडजडीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळ्यांचे गाठले, सोन्याचा मयूर हार, सोन्याचा गुलाब हार, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपट्टा, चांदीचा मुकूट आदी अलंकारांचा समावेश होता.
पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी विधिवत केली. तर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना केली गेली. या सोहळ्यात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ट्रस्टचे व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, तसेच मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार उपस्थित होते. उत्सवाच्या निमित्ताने भक्तांनी आद्यस्वयंभू सप्तशृंगी मातेच्या दर्शनाचा लाभ घेत आनंद साजरा केला. भक्तांच्या श्रद्धा, जयघोष आणि अलंकारांची शोभा यामुळे मंदिर परिसर आनंद व भक्तिमय वातावरणाने गरजला.
सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा व उत्साहाचा अनुभव ठरतो. यानिमित्ताने पुढील नऊ दिवसांपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय वातावरणामुळे सर्वत्र सप्तश्रृंगगडावर नवचैतन्याची अनुभूती येत आहे.