

सप्तश्रृंगी गड : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट रस्त्याच्या कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम गुरुवारी (दि. ९) पूर्ण झालेले आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता शुक्रवारपासून (दि.१०) पूर्ववत करण्यात आला आहे.
सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरी ते गड १० कि. मी घाट रस्त्याने वाहनधारक भाविकांना प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षांत या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठ्या दगडी पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले होते. यामध्ये काही भाविकांच्या वाहनांचेही नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतेच आहे. या गोष्टीचा विचार करून सप्तशृंगी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय इतर वेळी सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारपासून भाविकांना २४ तास कधीही या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आली. यानंतर डोंगरावर असलेले सैल दगड काढून टाकण्यात आले. डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आले तर ते दगड जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल. आजपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. - पीडब्ल्यूडी अधिकारी कळवण