Saptashrungi Devi : वणीची सप्तशृंगी भगवती अर्धे शक्तिपीठाचे दिव्य रहस्य

सप्तशृंगी गड म्हणजे अर्धे शक्तिपीठ वणीची देवीची अद्भुत महती
Saptashrungi Devi
Saptashrungi Devi Pudhari News Network
Published on
Updated on

वणी (नाशिक) : अनिल गांगुर्डे

राज्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे शक्तीपीठ पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती आहे. महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ कि.मी अंतरावर आहे. सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी नांदूरी गांव आहे. गडावर जाण्यासाठी ११ किमी. चा रस्ता घाटातून पार करावा लागताे. सप्तशृंगी मातेचे मंदिर असलेल्या डोंगरला सात शिखरे आहेत, म्हणून या देवीस्थानाला सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून ओळखले जाते. पूर्वेस मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे. गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. वणी गडावर शिवालय तीर्थ, शितला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी १०८ पवित्र कुंडे आहेत.

प्रचंड शीतकडा

तीर्थाच्या पुढे एक दरी शीतकडा म्हणून ओळखली जाते. ती सुमारे १५०० फूट खोल आहे. एका सवाष्णीने 'मला पूत्र प्राप्ती होऊ दे! भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन' असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली, अशी आख्यायिका आहे. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर आहेत असे मानले जाते. शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. भगवती देवी मंदिरात जाण्यासाठी ४७० पायऱ्या आहेत. इ.स. १७१० मध्ये उमाबाई दाभाडे यांनी पायऱ्या बांधल्याची नोंद आहे.

देवीची मूर्ती

सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून दर्शनासाठी येथे भाविक येतात. मंदिरात उच्चासनावर देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. काळया पाषाणातील मूर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, अठरा हातात १८ विविध आयूधे असे देवीचे स्वरुप आहे. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. तीने कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केले आहेत.

दर पौर्णिमेला व नवरात्रात येणाऱ्या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. देवीचा गाभारा भक्तांच्या श्रद्धेने चढवलेल्या ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी येथे यज्ञ केला. त्यातून देवी प्रकट झाली. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून देवीला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हणतात.

उत्तरेकडे फडकत असणाऱ्या ध्वजाचे महात्म्य

ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता मंदिरावर ध्वज फडकवला जातो.  ध्वज दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहमी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदी यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावणारी आहे अशी श्रद्धी आहे. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात.

सप्तश्रृंग गडाचा कायापालट व नवीन सुविधा

गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट झाला आहे. पायऱ्यांवर छत, आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहे. गडावर चढण्याचा व उतरण्याचा रस्ता वेगवेगळा आहे. चढाई करताना विश्रांतीसाठी भक्तांना जागा तयार केल्या आहेत. धर्मशाळेत राहण्याची उत्तम सोय आहे. ट्रस्टतर्फे नाममात्र दरात सात्विक जेवणाची सोय देखील आहे. गडावर छोटे नगर वसले आहे. ‘एमटीडीसी’ चीही विश्रामगृहे आहेत. देवीचे फोटो, पुस्तके, प्रसाद आदी पूजा साहित्य तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहीत वृंद गडावर आहेत. गुरुजींकडे घरगुती जेवणही सोय होऊ शकते.

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठ सप्तश्रृंगी होय. देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप मानले जाते. शुंभनिशुंभ व महिषासुर या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने गडावर वास्तव्य केले. देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे.  नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात सप्तश्रृंग गडावर यात्रा भरते.

गडावर ही पवित्र तीर्थस्थळे


श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. पैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे वणीची श्री सप्तशृंगी देवी होय. या स्थानाचा ‘नवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली, अशी श्रद्धा आहे. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता, असे सांगितले जाते. मंदिर परिसरात दाट जंगल आहे. देवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी पवित्र तीर्थस्थळे आहेत.
गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट आदी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी भक्तिभावाने संपन्न होतात.


जगात नारायणीचं अठराभुजा सप्तशृंग भव्य रूप जर कुठे बघायला मिळते, ते सप्तशृंगी गडावर! महाराष्ट्रातील आदिशक्ती देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचं मूळ स्थान सप्तशृंग गड हे होय. "ॐकारातील "म' कार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप, पूर्ण रूप आणि हीच आदिमाया असे मानण्यात येते. ही महिषासुरमर्दिनी श्री महालक्ष्मी देवी हीच महाकाली व महासरस्वती होय. या त्रिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.

देवीचे वात्सव्य

नांदुरी गावापाशी जो पर्वत आहे त्याला सात शिखरे आहेत. त्याच्या एका पर्वतावर देवीचे स्थान आहे. या सप्तशृंगस्थळी वास्तव्य करणारी ती "सप्तशृंगी' महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विसाव्यासाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे.

सप्तशृंग गडाबाबत महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही शिलाखंड खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. उपासनेतून मनुष्याला शक्ती प्राप्त होते त्यामुळेच शक्ती म्हणजेच जगदंबेची उपासना केली जाते. जगदंबेची अनेक शक्तिपीठे भूतलावर आहेत. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज आईच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये सापडतो. नवनाथ संप्रदायातील नाथापासूनच पीठाबद्दलचा कालावधी स्पष्ट सांगता येतो. शाबरी कवित्व अर्थात, मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली

सप्तशृंगी ट्रस्टची स्थापना सप्टेंबर १९७५ मध्ये झाली. त्याच वेळेस डोंगराच्या खोबणीत श्री भगवतीची मूर्ती समोरील बाजूस वीस बाय वीस पत्र्याची शेडमध्ये अशी होती.  विश्‍वस्त मंडळाने नंतर ६ हजाार चौरस फुटाच्या सभामंडपाचा आराखडा तयार केला.  १९८२ मध्ये कामास सुरवात झाली. गडावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. त्याला पहिली पायरी म्हणतात. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाच्या कपारीत भगवतीचे दर्शन घडते. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ, गळ्यात मंगळसूत्र व पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

आरतीची वेळ

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर आठ वाजता आईच्या महापूजेला सुरवात होते. त्यामध्ये आईच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी वा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. नवीन पानाचा विडा मुखी देऊन पेढा, वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता होते.  गडावर नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला भाविकांची मांदियाळी असते.  नवरात्रीला रोज मंदिरात शांतिपाठ होतो.  देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. नऊ दिवस विविध देवतांची आराधना, पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दशमीला पूर्णाहुतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्याच दिवशी मंदिराच्या शिखरावर रात्री वणीच्या दरेगावमधील गवळी हस्ते ध्वज लावला जातो. ध्वज लावण्याचा मान परंपरेनुसार गवळी पाटलालाच आहे.  उंच शिखरावर ध्वज लावून अंगावर कोणत्याही प्रकारची जखम व धूळ न लागता ही व्यक्ती सुखरूप खाली परतते.

सप्तशृंगी देवीबाबतचे दिव्य रहस्य

  • गडावर साप, नाग दिसत नाही, गडाच्या परिसरात सागाची झाडे असूनही नाग दिसत नाही. कावळयाचे दर्शन दुर्मीळ आहे.

  • देवी मध्ये महासरस्वती, महाकाली,महालक्ष्मी या त्रिगुणात्मिका आहेत.या मिळुन देवीचे स्वरुप आहे

  • वणी गडावर सप्त मातृका  शिवा, चामुण्डा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेयी, नारसिंही या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत.

  • गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिले, त्यांची समाधी आहे.

  • सप्तशृंग गड द्रोणागिरी पर्वताचा भाग : प्रभू श्रीराम- रावण युध्दात लक्ष्मण जखमी झाले तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आणण्यास सांगितले. तो आणताना त्याचा काही भूभाग सह्याद्री पर्वतात पडला; तो म्हणजे सध्याचा सप्तशृंग गड.

  • गडावर संजिवनी बुटी आहे. कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली, असे मानले जाते.

  • देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटीस येतात, त्या औदुबंराखाली शुभ्र नागराज असुन त्याच्या मस्तकात हिरा आहे.

  • श्रीराम-सिता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले असता गडावर देवीच्या नित्य दर्शनास येत असत,  असे सांगितले जाते.

  • देवीच्या व्दारी कासव आहे, कासवीन  प्रेमळ नजरेन आपल्या पिलांचे पालन पोषन करते, तशी भगवती देवी भक्तांचा सांभाळ करते, अशी मानले जाते. कासव गतीने दर्शनास यावे, हाही त्यामागील उद्देश आहे.

  • नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथाची शाबरी विद्या हिचीच देणगी आहे.

  • गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रम्हदेवाच्या कमंडलु मधून जे पाणी वाहिले, त्याचा मोठा प्रवाह तयार झाला. तिच गीरिजा(सध्याची गिरणा)नदी आणि त्यापासून हे तीर्थ तयार झाले, तिला गिरीजा तीर्थ असे संबोधतात.

  • या कुंडात सर्व देवानीं स्नान केले, असे हे पापविनाशक तीर्थ आहे.

  • कालिका तीर्थ : हे कुंड कपारीत असून याचे पाणी थंड आहे.

  • तांबुल तीर्थ : जेथे भगवती ने पानाचा विडा खाल्ला आणि चुळ भरली होती ते तीर्थ गडाच्या पश्चिमेला आहे. या कुंडाचे पाणी तांबडे आहे.

  • देवीच्या मुखातील विडयाला विलक्षण मान असतो. अशा खुप कमी देवी आहेत ज्यांना विडा भरवला जातो. गडावर दैनंदिन देवीला विडा भरवतात.  दुसर्‍या दिवशी तो विडा भक्तांना तांबुल म्हणून प्रसाद दिला जातो.

  • सूर्यतीर्थ या कुंडाचे पाणी कायम उष्ण असते.

  • सप्तशृंग पर्वताशेजारी नादुंरी गावानजीक एक पर्वत आहे. त्यास खिंडार आहे. देवी दैत्य युध्दात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे, अशी आख्यायिका आहे.

  • दैत्याला नाचवत दैत्य पळत वणी गडावर आला. तेथे देवीने महिषासुराचा वध केला, अशी मान्यता आहे.

सप्तशृंगी देवीला अठरा हात का आहेत

देवीने महिषासुराचा वध केला, तेव्हा तिने सर्व शक्ती आणि रूप एकत्र केली. या घटनेचे वर्णन मार्कंडेय पुराणातील 'देवी महात्म्य' मध्ये आढळते. त्यानुसार, सर्व देवतांनी महिषासुराचा वध करण्यासाठी आपापली शस्त्रे आणि शक्ती देवीला अर्पण केली. या प्रसंगानुसार, प्रत्येक देवतेने देवीला एक-एक शस्त्र दिले. ज्यामुळे देवीच्या हातात एकूण अठरा शस्त्रे झाली. ही अठरा शस्त्रे आणि ती देणारे देव म्हणजे शंकरांनी त्रिशूल दिले. विष्णूंनी चक्र, वरुण (जलदेवता) यांनी शंख दिला. अग्निदेवांनी शक्ती (भाला) तर वायूदेवांनी धनुष्य आणि बाण दिले. इंद्राने वज्र  तर यमाने दंड (काठी) दिला. सूर्यदेवांनी बाण आणि ढाल तर चंद्राने तलवार दिली. विश्वकर्मा यांनी परशु (कुऱ्हाड) दिली, कुबेराने गदा दिली. ब्रह्मदेवांनी कमंडल आणि मंत्रशक्ति तर  समुद्रदेवांनी हार आणि रत्न दिले आणि हिमालयाने सिंह दिला. या सर्व देव-देवतांच्या शक्तींचा संगम असल्याने देवी अठरा भुजा धारण करते. अठरा भुजा हे देवीच्या सामर्थ्याचे आणि सर्वशक्तिमान रूपाचे प्रतीक आहे. ती फक्त एकटी देवी नसून, सर्व देवतांच्या शक्तींचा आणि गुणांचा एकत्रित अविष्कार आहे.

सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी मार्ग व निवासाच्या सोईसुविधा अशा...

रेल्वे: सप्तशृंगी गडापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे. मुंबई, पुणे, भुसावळ, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतून इथे थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नाशिक रोडहून वणीला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी सहज मिळते.

राज्य परिवहन महामंडळाचे बस : बस थेट सप्तश्रृंगीगड पर्यंत जाते. नाशिकहून दिंडोरीमार्गे वणी सप्तश्रृंगीगड जाण्याचा मार्ग सुमारे ६०-७० किमी आहे. मुंबईहून (२६०-२८० किमी) किंवा पुण्याहून (३०० किमी) नाशिकमार्गे वणीला जाता येते.

विमान : गडाच्या सर्वात जवळचं विमानतळ नाशिकमधील ओझर एअरपोर्ट आहे (५०-५५ किमी). जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरून येत असाल तर मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  सर्वात जवळचं आहे (२७० किमी). विमानतळावरून वणीला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस उपलब्ध आहेत.

सप्तशृंगी गडावर निवास सोय याप्रमाणे

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट: गडावर किंवा वणीमध्ये ट्रस्टच्या धर्मशाळा आणि यात्रेकरू निवास उपलब्ध आहेत. इथे साध्या खोल्या आणि डॉर्मिटरी स्वरूपातील राहण्याची सोय असते. इथे एका रात्रीसाठी साधारणपणे ₹३०० ते ₹६०० पर्यंत खर्च येतो.

खाजगी हॉटेल्स/लॉज: वणीच्या बाजारात, गडाच्या पायथ्याशी आणि नाशिक रोड परिसरात अनेक खाजगी हॉटेल्स आणि लॉज आहेत.

नॉन-एसी खोल्यांसाठी एका रात्रीचा खर्च साधारण ८०० ते १५०० रुपये पर्यंत आहे.
एसी खोल्यांसाठी हा खर्च १५०० ते २५०० रुपये पर्यंत आहे

नाशिक शहर : जर गडावर न थांबता नाशिक शहरात राहायचे असेल, तर तिथे तुम्हाला १००० पासून ते ४०००-५००० रुपये पर्यंतच्या दरात चांगले हॉटेल्स उपलब्ध आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news