

नाशिक : अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंग गडावर गुरुवारी (दि. 10) लाखोंच्या उपस्थितीमुळे चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. प्रत्यक्षात जीवितहानी झाली नसली, तरी देवस्थान अथवा धार्मिक क्षेत्री झालेल्या भूतकालीन घटनांचा संदर्भ पाहता आताचा प्रकार सप्तशृंगगड प्रशासनासाठी जागते रहोचा अलर्ट देणारा ठरावा. दरवर्षीच्या उत्सवाचे नियोजन करताना त्यातील जोखीम व्यवस्थापनाची तटबंदी भक्कम करण्यावाचून तरणोपाय नसल्याचे भान राखणे यापुढे अनिवार्य राहणार असल्याचा सूचक इशारा संबंधित घटनेने दिल्याचे म्हणता येईल.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर भाविकांची तशी वर्षभर वर्दळ आढळते. चैत्रोत्सव आणि लक्षावधी भाविकांची गर्दी हे तर गडाबाबत समीकरणच झालले आहे. यंदाच्या चैत्रोत्सवात महाराष्ट्रातील भाविकांची मांदियाळी असणार हे नक्की होते. दरवर्षी चैत्रोत्सवातील चतुर्दशीला खानदेशवासी मोठ्या संख्येने येतात, तशी गुरुवारीही गर्दी उसळली होती. तब्बल दोन लाख भाविकांच्या उपस्थितीमुळे नियोजनात गडबड झाली. प्रचंड रेटारेटीमुळे बॅरिकेड्ससह प्रशासकीय नियोजनही धारातीर्थी पडले. उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मंदिर व्यवस्थापनह पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. इथला अर्धा तासाहून अधिक काळ सगळ्यांसाठी कसोटीचा असताना सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरावी.
दरवर्षी सप्तशृंग गडावरील चैत्रोत्सव पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातील बिनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे सोपस्कार पार पाडले जातात. या बैठकीत उत्सव नियोजन, कायदा सुव्यवस्था, मदतकार्य, आपत्कालीन परिस्थिती आदी मुद्द्यांचा उहापोह करण्यात येतो. एवढे असूनही मंदिर प्रशासनाला चैत्रोत्सवातील दोन दिवशी होणाऱ्या वाढीव गर्दीचा अंदाज घेण्यात अपयश आले का, अशी चर्चा आता सुरू आहे. भविष्यातील नियोजनात आमूलाग्र बदल करणे अपरिहार्य ठरणार असल्याचा सूचक संदेश गुरुवारच्या घटनेने दिल्याचे म्हणता येईल.
देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे. सप्तशृंग गडाचे उंचावरील स्थान लक्षात घेता गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अपरिहार्य आहे. विशेषत: चैत्रोत्सवात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहानगे यांची संख्या लक्षणीय असते, याची जाणीव असूनही मंदिर प्रशासनाला बॅरिकेड्स गंजलेले असल्याचे ध्यानात आले नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. २००२ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुर्घटना म्हणा किंवा अलीकडील प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा प्रकार, जिल्हा प्रशासनाने त्यामधून धडा घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सप्तशृंग गडावरील देवीचे स्थान डोंगरकड्यावर असल्याने जोखमीचा भाग नाकारता येत नाही. स्वाभाविकच इथे दरड कोसळण्याच्या घटना अधूनमधून होतात. दरवर्षी ऋषिपंचमीला मार्कंडेय पर्वतावर होणाऱ्या यात्रेदरम्यान महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दोन वर्षांपूर्वी या दिवशी दरड कोसळली होती. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या यात्रेवरच फुली मारून भाविकांच्या भावना पायदळी तुडवल्या. आताच्या घटनेनंतर मूळ कारणांचा शोध घेण्यापेक्षा चैत्रोत्सवावर संक्रांत आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.