

सप्तशृंगगड (नाशिक): साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगडगडावर रविवार (दि. 6) पासून चैत्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 12 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक गडावर हजेरी लावण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी दिवसभर हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवत देवी दर्शनाचा लाभ घेतला.
रामनवमी आणि चैत्रोत्सवाच्या प्रारंभी सकाळी देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विश्वस्त संस्थेच्या वतीने देवीला सुवर्ण अलंकारांनी सजवून संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते पूजा करण्यात झाली. तर श्री भगवतीची चांदीच्या मूर्तीची प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीचंद डी. जगमलानी यांच्या हस्ते पंचामृत महापूजा व महाआरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता देवी मंदिरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव पूजा करून सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, भूषणराज तळेकर, डॉ. प्रशांत देवरे, कर्मचारी, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके आदींसह कर्मचारी व भाविक उपस्थित होते.
चैत्रोत्सवादरम्यान देवी दर्शनासाठी राज्यसह विविध भागांतून भाविक येणार असल्याने मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजा, दुपारी महानैवेद्य आरती व सायंकाळी सांजआरती या तीनही वेळेत भगवतीची आरती होणार आहे. या दरम्यान सकाळ व संध्याकाळी ट्रस्टच्या वतीने मोफत महाप्रसाद होणार आहे.
गडावर वर्षभरात चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सव अशी दोन वेळा देवीची यात्रा भरते. या काळात दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे राज्यभरात भाविक दर्शनासाठी येतात. विशेषत: खान्देशातील लाखो भाविक गडावर पायी हजेरी लावतात. दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनासह ट्रस्टकडून सर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत.