

सप्तशृंगगड ( नाशिक) : सप्तशृंग गडावर जाणाऱ्या घाट मार्गावरून हजार फूट खोल दरीत कार पडून सहाजण ठार झाल्याची घटना घडली. गडावरील रतनगड व गणपती पॉइंटमध्ये इनोव्हा कार हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पिंपळगाव बसवंत येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात तीन महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार पिंपळगाव येथील व्यावसायिक कीर्ती पटेल यांच्या कुटुंबात एका महिन्यात दोन विवाह पार पडले. विवाहानंतर ते कुटुंबासह सप्तशृंग गडावर देवदर्शनसाठी गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर कीर्ती पटेल हे स्वत: इनोव्हा कार (एमएच १५ बीएन ५५५) चालवत होते. सप्तशृंग गडावरून दर्शनानंतर चार किलोमीटर कार आली असताना त्यांचा गणपती पॉइंट परिसरात कारवरील ताबा सुटला. कार कठडे तोडून दरीत एक हजार फूट कोसळली. या कारमध्ये सहा प्रवासी होते. यात सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नांदुरी व सप्तशृंगी गड येथील स्थानिक ग्रामस्थ, पोलिस, आपत्कालीन पथक व आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्याचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू होते.
अपघातग्रस्तांना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे मदत करणाऱ्या पथकाच्या संपर्कात आहेत.
यांचा झाला अपघातात मृत्यू
कीर्ती पटेल (५०, चालक), रसिला पटेल (५०), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०), पचन पटेल (६०), मणिबेन पटेल (६०)