

त्र्यंबकेश्वर (नाशिक): चैत्र वद्य एकादशी तथा वरूथिनी एकादशीनिमिताने गुरुवारी (दि. 24) उटीची वारी होत आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेने दुपारी 2 वाजता संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीला चंदनाची उटी म्हणजेच लेप लावण्यात येत आहे. यासाठी मंगळवारपासून वारकरी लक्षणीय संख्येने त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. बुधवारी (दि. 23) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दिंड्यांचा ओघ सुरू होता. त्र्यंबकेश्वर शहरात टाळ-मृदंगाच्या ठेक्यात हरिनामाचा गजर होत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास 70 ते 80 छोट्या दिंड्या आलेल्या होत्या.
उटीची वारी पर्वकाळ साधण्यासाठी आणि उटीचा प्रसाद घेण्यासाठी वारकरी गुरुवारी अधिक संख्येने येतील. रात्री उशिरापर्यंत येथे थांबतील. त्र्यंबक नगर परिषद प्रशासन, एसटी महामंडळ मिनी यात्रेसाठी सज्ज झाले आहेत. संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर ट्रस्ट यांनी सर्व सज्जता केली आहे. मंदिर प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे. दर्शनबारी व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंदिर संस्थांन अध्यक्ष अॅड. सोमनाथ घोटेकर आणि विश्वस्त मंडळ येथे लक्ष ठेवून आहेत.
उत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. 25) चैत्र वैद्य द्वादशीस असेल. यानिमित्त सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान रंगनाथ महाराज खाडे यांचे काल्याचे कीर्तन होईल. सायंकाळी 5 वाजता भगवान त्र्यंबकराज भेट व नगरप्रदक्षिणा होईल. चांदीच्या रथातून संत निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकेश्वर मंदिरात येतील. येथे मंदिर प्रांगणात भजन, कीर्तन, अभंग सेवा होईल. तेथून कुशावर्तावर आणि पुन्हा रात्री 8 वाजता समाधी मंदिरात रथ परत येईल. आरती व महाप्रसाद होऊन उटी वारी सप्ताहाची सांगता होईल.
गुरुवारी (दि. 24) दुपारी 2 वाजता संत निवृत्तिनाथ संजीवन समाधीस चंदनाची उटी लावण्यास प्रारंभ झाला आहे. यावेळेस सभामंडपात भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 8 ते 10:30 चैतन्य महाराज देगलुरकर यांचे हरिकीर्तन. त्यानंतर विधिवत उटी उतरवण्यात येईल व रात्री 11:00 नंतर आलेल्या वारकरी भाविकांना चंदनाच्या उटीचा द्रवरूप प्रसादवाटप केला जाईल.