

नाशिक : राज्यात सुबत्ता राहावी, बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना मंत्री गिरीश महाजन यांनी संत निवृत्तिनाथांच्या चरणी शनिवारी (दि.25) केली. त्र्यंबकेश्वर येथील पौषवारी यात्रेनिमित्त पहाटे 4 च्या सुमारास जलसंपदामंत्री महाजन यांनी सपत्नीक नाथांच्या संजीवन समाधीची महापूजा केली. त्यांच्या समवेत आमदार हिरामण खोसकर, मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके, विश्वस्त मंडळ अध्यक्षा कांचन जगताप उपस्थित होते.
पूजेनंतर सभामंडपात झालेल्या सन्मान कार्यक्रमात संत निवृत्तिनाथ संस्थानचे माजी विश्वस्त तथा वारकरी महामंडळाचे पदाधिकारी पुंडलिक थेटे यांनी कुंभमेळा आराखड्यात वारकऱ्यांसाठी सेवा सुविधांचा समावेश करावा. त्र्यंबकेश्वर येथे दररोज हजारो भाविक येतात. मात्र, त्यांना संत निवृत्तिनथांचे संजीवन समाधी मंदिर माहीत होत नाही. विकास आराखडा करताना यासाठी सुयाेग्य नियोजन करावे. दरवर्षी भरणाऱ्या पौषवारीसाठी कायमस्वरूपी सुविधा कराव्यात, अशी मागणी केली. संस्थानाच्या अध्यक्षा कांचन जगताप, सचिव प्रा. अमर ठोंबरे, नवनाथ महाराज गांगुर्डे, नारायण मुठाळ, योगेश गोसावी, जयंत गोसावी, श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह विश्वस्त, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, शहर अभियंता स्वप्निल काकड आदी उपस्थित होते.