

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
संजय गांधी निराधार अनुसूचित जाती अन् जमाती योजनेंतर्गत ऑक्टोबर महिन्याअखेर 21 हजार 870 लाभार्थ्यांना एकूण 16 कोटी 82 लाख 35 हजार 800 रुपयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीच्या 7 हजार 973 लाभार्थ्यांना 6 कोटी 19 लाख 27 हजार 200 तर अनुसूचित जमातीच्या 13 हजार 897 लाभार्थ्यांना 10 कोटी 63 लाख 8 हजार 600 कोटींचे वाटप करण्यात आले
संजय गांधी निराधार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राबविली जाणारी योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत राबविली जात असून या अंतर्गत अपंग, दुर्धर, आजारी, निराधार पुरुष/महिला, विधवा, परित्यक्त्या, अनाथ मुले पोटगी न मिळालेल्या महिला, वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारित महिला, 35 वर्षावरील अविवाहित महिला, कैद्यांच्या पत्नी यांना 1500 रुपये प्रतिमहिना लाभ दिला जातो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार पेक्षा कमी आहे अशाच लाभार्थ्यांना हा लाभ दिला जातो. 50 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेचा निधी 100 टक्के राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येतो. योजनेचे पैसे डीबीटीमार्फत लाभार्थ्याच्या खात्यावर प्रतिमाह जमा करण्यात येतात. संजय गांधी निराधार योजनेचा सर्वाधिक लाभ मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीणला मिळत असून, सर्वात कमी लाभार्थी कळवण, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा या भागांत आहेत.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावी.
विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, तलाठी यांचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचा दाखला. विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला.
मंजूर अर्जावर आधारित दरमहा रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा होते. यासाठी आधारकार्ड बँकखात्याला लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज मंजुरीसाठी साधारणत: 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. लाभ नाकारणाऱ्या अर्जासाठी कारण दिले जाते, सुधारणा करून पुन्हा अर्ज सादर करता येतो.