

येवला (नाशिक) : ग्रामीण भागात आजही आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषत: महिलांकडून मासिक पाळीच्या काळात आवश्यक ती काळजी न घेतल्याने अनेक आजार उद्भवतात. याच बाबींचा विचार करून विखरणी ग्रामपंचायतीने दर महिन्याला गावातील महिलांना सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विखरणी येथील सरपंच ज्योती मोहन शेलार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात गावातील महिलांना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जातात. महिला, किशोरवयीन मुली दिवसभरात कधीही येऊन ग्रामपंचायत कार्यालतयानू सॅनिटरी पॅड घेऊन जाऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतीकडून आधी महिला व किशोरवयीन मुलींना सनिटरी पॅड वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच मासिक पाळीच्या काळात आराेग्याची कशी काळजी घ्यावी, पॅडचा वापर का आवश्यक आहे इत्यादीबाबत महिलांचे प्रबोधन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ सरपंच ज्योती शेलार व ग्रामसेविका छाया ठाकरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यापुढे सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सदस्य मीना पगार, सुरेखा रोठे, राधा पवार, अनिता खरे, सविता आहिरे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका रश्मी शेलार, सविता वाघमोडे, अनिता खुरसने, आशा सेविका शबाना दरवेशी, ज्योती बंदरे, जि. प. शाळा शिक्षिका, ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
सध्या ग्रामपंचायतीला उपलब्ध महिला व बालकल्याण निधीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोग निधीतून खर्चाचे नियोजन आहे. तसेच मी स्वत:चे सरपंच मानधनदेखील या कामी देणार आहे.
ज्योती शेलार, सरपंच, विखरणी, ता. येवला, नाशिक.