

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत असून, आता या प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. बनावट खाती उघडण्यास मदत केल्याच्या आरोपावरून समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरोधात राहता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भोंदू अशोक खरात यालाही आरोपी करण्यात आले असून, त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे.
तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समता पतसंस्थेत तब्बल १३२ बनावट खाती उघडण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, बँक किंवा पतसंस्थेमध्ये खाते उघडताना संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते, तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक असते.
मात्र, या सर्व नियमांना फाटा देत इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट खाती उघडण्यात आली कशी, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर संशयाचे सावट आहे. या प्रकरणात समता पतसंस्थेचे प्रमुख काका कुयटे आणि संदीप कुयटे यांच्याही भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व खाती नियमांनुसारच उघडण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, सध्याच्या तपासातून समोर येणाऱ्या बाबी त्यांच्या दाव्याला छेद देणाऱ्या ठरत आहेत.
दरम्यान, काका कुयटे आणि अशोक खरात यांच्यातील संबंधही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात काका कुयटे यांनी खरात यांच्या पाया पडल्याची घटना मोठ्या प्रमाणावर चर्चिली गेली होती. तसेच, आपल्या भविष्याबाबत त्यांनी केलेले विधान आणि राजकारणात यश मिळेल, असा दावादेखील खरात यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळेच केल्याची चर्चा रंगली आहे.
सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या बनावट खात्यांमधून झालेले आर्थिक व्यवहार, निधीची हालचाल आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा बारकाईने तपास केला जात आहे. या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.