

आजचे नाटक -एक धुरंदर तीन बिलंदर
लेखक व दिग्दर्शक -दिलीप गोसावी
वेळ -सायंकाळी ७ वाजता
स्थळ - परशुराम साइखेडकर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा एका बाजूला शस्त्र उचलणारे नक्षलवादी आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षेच्या नावाखाली उभी राहिलेली 'सलवा जुडूम' चळवळ यांच्या कात्रीत अडकलेल्या तरुण पिढीची घुसमट 'सलवा जुडूम' या नाटकाने सादर करीत हिंसेच्या कात्रीत अडकलेला जगण्याचा संवेदनशील आरसा दाखविला. विचार आणि प्रेमाचा मार्ग सोडून हातात बंदूक घेतल्यावर माणुसकीचा होणारा हास अधोरेखित करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांना अंतर्मुख करीत डोळ्यात अंजन घातले.
६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेअंतर्गत नाट्यगोदा बहुउद्देशीय संस्था आणि स्वामिनी थिएटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन अंकी 'सलवा जुडूम' या नाटकाचा प्रयोग सोमवारी (दि. २३) परशुराम साइखेडकर नाट्यगृहामध्ये सादर ६५ करण्यात आला. लेखक हौशी मराठी नाटय इरफान मुजावर यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि सनी धात्रक दिग्दर्शित या नाटकाने हिंसेच्या वणव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्यांची व्यथा रंगमंचावर प्रभावीपणे मांडली.
नक्षलवाद, शासकीय यंत्रणा आणि त्यांच्या संघर्षात भरडल्या जाणाऱ्या आदिवासींच्या जगण्याचा संघर्ष हा या नाटकाचा मुख्य गाभा आहे. यात तरुण पिढीची घुसमट पाहायला मिळते. एका बाजूला हिंसेच्या मार्गावरील नक्षलवादी आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षेच्या नावाखाली उभी राहिलेली 'सलवा जुडूम' ही चळवळ यांच्या कात्रीत अडकलेली 'वेदी' आणि 'श्याम' यांची तरुण पिढी पाहायला मिळते. विचार आणि प्रेमाचा मार्ग सोडून जेव्हा हातात बंदूक घेतली जाते, तेव्हा माणसातील माणुसकी कशी नष्ट होते, याचे अंगावर आणणारे चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नाटकातील 'जायों' हे स्त्री पात्र सादर करण्यात आले. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेमुळे नात्यांमधील भावनिक कंगोरे अधिक गडद झाले.
नकुल चौधरी, भैरवी कमानकर, सनी धात्रक, स्वप्ना विंगळे, सुनील गांगुर्डे, सागर चव्हाण या कलाकारांनी आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय देत नाटकातील ताणतणाव जिवंत केला. माणिक नाना कानडे यांची रंगभूषा, विनोद राठोड यांची प्रकाशयोजना, भूषण भावसार यांचे संगीत, दुर्वाक्षी पाटील व समाधान मुर्तडक यांचे नेपथ्य आणि संगीता साबळे यांची वेशभूषा यांनी या संवेदनशील मांडणीला भक्कम साथ दिली.