

नाशिक : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. नाशिकच्या साहित्यवर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. ही निवड योग्य आणि सार्थ असून, परखड आणि ठाम भूमिका मांडणाऱ्या ऐतिहासिक कादंबरीकाराचा हा उचित सन्मान असल्याची प्रतिक्रिया येथील साहित्यिक, कवी आणि लेखकांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केल्या.
आपली मते ठामपणे मांडणाऱ्या आणि प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या साहित्यिकाला मिळालेला हा सन्मान आहे. त्यांची पुस्तके केवळ ‘बेस्ट सेलर’च नव्हे तर प्रचंड वाचकप्रिय आहेत. अभ्यासू, व्यासंगी आणि आपलाच इतिहास आपल्याला नव्याने समजून सांगणारे ते कादंबरीकार आहेत. राजकीय आणि सामाजिक संदर्भातून त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड अतिशय उचित अन् अभिनंदनीय ठरते. कांदबरी प्रकाराला त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरुन चालना, प्रेरणा द्यावी.
विवेक उगलमुगले, कवी, लेखक.
अध्यक्षपदामुळे लेखक, साहित्यिकांना सन्मान मिळत असतो. विश्वास पाटील यांच्या निवडीचा अत्यानंद झाला. त्यांचे मराठी साहित्य विश्वात मोठे योगदान असून उत्तुंग उंचीच्या लेखकाला हा बहुमान यापूर्वीचीच मिळायला हवा होता. मात्र, उशिरा का असेना त्यांच्या याेगदानाची दखल घेतली गेली. योग्य वयात योग्य वेळी संमेलन अध्यक्षपद मिळालं तर त्या लेखकालाही समाधान आनंद वाटतो.
विजयकुमार मिठे, ग्रामीण साहित्यिक.
‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही ऐतिहासिक लेखन करणाऱ्या एका अभ्यासू साहित्यिकाचा बऱ्याच वर्षानंतर झालेला सन्मान आहे. ऐतिहासिक चरित्रांचा व्यासंगी अभ्यास करत ग्रंथांच्या माध्यमातून मांडणी करणारे आणि इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वांवर प्रकाश टाकणारे साहित्यिक म्हणून त्यांचा नेहमीच आदर वाटतो. जुनी आणि नव्या पिढीतील ऐतिहासिक लेखन करणाऱ्या साहित्यिकांना हा सन्मान प्रेरणादायी ठरणारा आहे.
रवींद्र मालुंजकर, कवी.
पाटील यांचे साहित्य वाचत अनेक लोक घडले. कांदबरीसारखे साहित्यिक लिहिण्यासाठी व्यासंग, विचारांची तसेच लिखणाची बैठक लागते. पाटील यांनी ऐतिहासिक कांदबऱ्यामधून नवीन दृष्टी समाजाला दिली. अशा कांदबऱ्या लिहिणे आव्हानात्मक असते परंतु त्यांनी प्रचंड अभ्यास, संदर्भ तथ्थे गोळा करुन ऐतिहासिक कांदबऱ्या लिहिल्या, त्या वाचकप्रिय ठरल्या. त्यांची निवड योग्य आणि आनंददायी आहे.
राजेंद्र उगले. साहित्यिक.
एका सक्षम प्रशासकीय अधिकाऱ्याने साहित्य क्षेत्रात तेवढ्याच सक्षमतेने योगदान देणं हे महत्त्वपूर्ण तितकेच कौतुकास्पद ठरते. साहित्य लिहिणे सोपे पण इतिहास मांडणे आणि तो पुढच्या पिढीच्या हातात देणे ही आव्हानात्मक तसेच कसरतीची गोष्ट असते. ती विश्वास पाटील यांनी समर्थपणे हाताळली आहे. ऐतिहासिक कांदबऱ्यांमधून त्यांनी इतिहास, संस्कृती वाचकांसमोर मांडली. संमेलनाध्यक्षपदाच्या भूमिका, मार्गदर्शन या निमित्ताने वर्षभर वाचकांना मिळत राहणार आहे.
प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे. साहित्यिका