Safed Musli | सफेद मुसळी जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर

जाणून घ्या काय आहेत या वनस्पतीचे फायदे
safed musli
सफेद मुसळी जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावरप्रशांत हिरे

सुरगाणा प्रतिनिधी : एकेकाळी आदिवासी भागात कंदवर्गीय रानभाजी म्हणून सफेद मुसळी अर्थात आदिवासी बोलीत कवळीची भाजी म्हणून ओळखली जाणारी सफेद मुसळी आता जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जून मध्ये पहिल्या पावसाला सुरुवात झाली की जंगलात अनेक कंदवर्गीय रानभाज्या उगवतात यामध्ये शेवळा, दीहगडी, लोत, तेरा, कवळीची भाजी ( सफेद मुसळी) अशा भाज्या मुख्यतः पावसाळ्यात सुरुवातीला आढळतात. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कवळीची भाजी मुबलक प्रमाणात जंगलात आढळत असे. जसे जसे या भाजी मध्ये असलेले औषधी गुणधर्म तसेच उच्च प्रतीचे प्रथिने शरीरास मिळणारे पोषक घटक यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागल्याने लोकांनी हव्यासापोटी तसेच अर्थाजन करीता जंगलातून कंदसह खणून आणत व्यापा-यांना विकली आज सफेद मुसळी जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज कोरडवाहू शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी करीता शेती केली जाते आहे.

तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागात जास्त प्रमाणात लागवड केली जाते आहे. म्हैसखडक, दोडीपाडा, उंबरठाण, चुली, शिवपाडा, देवीपाडा, दरापाडा, वडपाडा, फणसपाडा, चुली, बेहुडणे, राशा, बोरचोंड, वांगण, करंजुल, मांधा, रघतविहीर, चिंचमाळ, बर्डा, गाळबारी, पिंपळसोंड, कोठुळा, काठीपाडा सुळे, विजयनगर, पालविहीर या गावातील शेतकरी सफेद मुसळी लागवडीकडे वळले आहेत.

खरेदी- विक्रीतून होतेय कोटींची उलाढाल

तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाण तसेच गुजरात राज्यातील बिलदा, धरमपूर येथे सफेद मुसळी खरेदी केली जाते. मागणी, पुरवठा, आवक यानुसार भाव दिला जातो. साधारणपणे एक हजार दोनशे रुपये पासून ते दोन हजार चारशे रुपये पर्यंत प्रति किलो वाळलेल्या कंदाला भाव मिळतो. लागवडी करीता बियाणे विकत घ्यायचे असेल तर ओले बियाणे प्रति किलो पाचशे रुपये दराने मिळते. यामध्ये एक काडी व काप्या असे जाती पहावयास मिळतात. एक काडी अथवा एक कंद लावला जातो. काप्या मध्ये एकापेक्षा जास्त कंद एका जागेत लावतात.

लागवडीचे तंत्र

साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केली जाते. यासाठी माळरानावर किंवा भात खाचरात ( आवणात) उताराच्या जागेची निवड करून ती जागा नांगरणी करुन मशागत करुन भुसभुशीत केली जाते. बेड गादी वाफे करुन ( रताळी, हळद, अळु) लागवडी सारख्या एका सरळ रेषेत हारी करुन हारीवर रांगेत लागवड करतात. त्याचवेळी थोड्याफार प्रमाणात खत दिले जाते. नंतर निंदणी केली जाते. कमी पाऊस पडला तर उत्पन्न जास्त मिळते.पावसाचे प्रमाण अधिक असले तर कंद कुजून खराब होतात त्यामुळे उत्पादनात घट होते. ऑक्टोबर महिन्यात काढणीला सुरुवात केली जाते. वाफ मिळाली तर कंद लवकर सोलले जातात.

औषधी गुणधर्म

सफेद मुसळी हे उच्च मूल्यांचे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यास तसेच मुख्यत्वे स्रीयांच्या आरोग्यविषक समस्यांवर मदत करते. या भाजीमधून विविध प्रथिने, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात.

पारंपरिक भात शेती पेक्षा अधिक उत्पन्न देणारी बाब असल्याने भात उत्पादक शेतकरी आता सफेद मुसळी लागवडी कडे वळत आहेत. कमी मेहनती मध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते. सुरगाणा तालुका अरबी समुद्र सपाटीपासून जवळ असल्याने तालुक्यात उष्ण व दमट असे पोषक हवामान पिकासाठी उपयुक्त आहे. शेती मध्ये विविधता तसेच आलटून पालटून पिक घेतल्याने जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते.

सफेद मुसळी लागवडी करीता शासन स्तरावरून अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news