नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीला गुरुवारी (दि.२) शहरात २१ ठिकाणी निघालेल्या सघोष शिस्तबद्ध पथसंचलनात ४००० हून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध घोषपथकासह गणवेशात सहभाग घेऊन संघशक्तीसह चैतन्याची पखरण केली. संघ यावर्षी आपले शताब्दी साजरी करत आहे. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये अधिक उत्साह, आनंदाचे तेज झळकले होते. विविध १५४ ठिकाणी शस्त्रपूजनही करण्यात आले.
संघाच्या परंपरेनुसार प्रतीवर्षी विजयादशमीला सघोष संचलन केले जाते. शहरातील विविध भागात अत्यंत उत्साहात संचलन करण्यात आले. एकूण संघ रचनेतल्या २१ नगरांमध्ये २० ठिकाणी पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. संचलनाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक यामध्ये सहभागी होते.
११०० हून अधिक स्वयंसेवकांनी प्रथमच गणवेशात सहभाग घेतला. महिलांचा वाढलेला सहभाग यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. अनेक कुटुंबातील दोन ते तीन पिढ्यातील आजोबा, नातू, वडील आणि मुलगा असे सदस्य एकत्र सहभागी झाले. अनेक संस्थांचे चालक, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संस्कृती, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच अनेक गणेश मंडळाचे आणि विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारीही स्वयंसेवक म्हणून गणवेशात सहभागी झाले. शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर्स, वकिल, व्यापारी, शिक्षक, नोकरदार आदींसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश लक्षणीय ठरला.
उपस्थित अतिथी मान्यवर
डॉ. महेश मालू, प्रशांत पाटील, सुनील जगताप, नृसिंहकृपा दास प्रभू (इस्कॉन), कविता राऊत, ललित बुब, परेश शर्मा, डॉ. राजेंद्र कडणर, डॉ. भूषण गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी प्रमोद कुलकर्णी, राजेश राव, शहर संघचालक विजय मालपाठक, सुहास वैद्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मालेगाव/देवळा : शहरात विजयादशमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष, सवाद्य पथसंचलन पार पडले. संघाचे शताब्दी वर्ष असल्याने यावेळी अधिक उत्साह होता.
जिल्हा संघचालक अशोक कांकरिया, शहर संघचालक नितीन मुनोद यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. लाठीकाठी गणवेशासह ढोलच्या तालावर काढण्यात आलेल्या पथसंचलनात यावेळी प्रथमच विक्रमी 736 स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. संचलनादरम्यान प्रमुख चौकात संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून सुरू झालेले संचलन शहरातील पूर्व पश्चिम भागातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवळा शाखेतर्फे विजयादशमीनिमित्त प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. शहर, तालुक्यातील संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सायंकाळी 5 च्या सुमारास शिस्तबद्ध रीतीने गणवेशात लाठीकाठी हातात घेत पथसंचलन करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवस्मारकाजवळ संचलनाचा समारोप झाला. संचलनात पुंडलिक आहेर, श्यामराव सूर्यवंशी, बापू शिंदे, भाऊसाहेब शिंदे, मोठाभाऊ पगार, बंडू शेवाळकर, विष्णू शेवाळे, विजय आहेर, हर्षद मोरे आदींसह स्वयंसेवक सहभागी झाले होते.