

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे अमृत भारत एक्स्प्रेसमधून एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी (दि. १२ ) फलाट तीनवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका तरुणाच्या बॅगेत एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा आढळल्याने रेल्वेस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाला रोकडसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बाळासाहेब भामरे (२४, रा. गोमवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. जळगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतलेली असताना एका तरुणाकडे ही रक्कम आढळली. भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड आरपीएफ निरीक्षक एन. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत होती.
दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील फलाट तीनवर अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये तपासणी सुरू असताना बॅग घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली आरपीएफ जवानांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे जवानांनी त्याची चौकशी केली. बॅगेतील साहित्याबाबत विचारणा केली असता त्याला उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक लवकुश वर्मा आणि सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव यांनी पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी केली असता चलनी नोटा आढळून आल्या.
नोटांची मोजणी केली असता ती रक्कम एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम हस्तगत केल्यानंतर आरपीएफने संबंधित तरुणाला रकमेसह आयकर विभागाकडे सुपूर्द केले. आरपीएफचे नरेंद्र पाडवी, गौतम बिराडे, रवींद्र राठोड यांनी ही कारवाई केली.
रोकड आली कुठून ?
मोठ्या प्रमाणात रोकड तरुणाकडे कशी आली, तिचा नेमका स्रोत काय आहे आणि ही रक्कम कोणाकडे व कोणत्या कारणासाठी नेली जात होती, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बाबींचा तपास आयकर विभागाकडून केला जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने रेल्वेस्थानकांवरील विशेष तपासणी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे