

नाशिक : अवकाळीने तब्बल दोन एकर कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यावर आली आहे. शेतीची मशागत, कांदा बियाणे, मजुरी आणि पीक वाचवण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाया गेल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने पिकावर रोटाव्हेटर फिरवल्याची घटना घडली.
शेतकरी हा नेहमीच भविष्य काळावर जगत असतो. उत्पन्नाची हमी नसल्याने भविष्याची स्वप्न पाहण्याची वेळ येते. लहरी हवामानामुळे कोणत्याही हंगामाचा भरवसा राहिलेला नाही. यावर्षी अगोदर अतिवृष्टीनंतर अवकाळीमुळे शेतीचे पूर्णतः नुकसान झाले. या संकटातूनही काही शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र, निसर्गाचा कोप काय असतो हे निसर्गाने दाखवूनही दिले. रायपूर येथील शेतकरी पुंडलिक निकम यांनी दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. अतिवृष्टीतून त्यांनी पीक वाचवले. मात्र नंतर झालेल्या अवकाळीमुळे पीक वाचवण्याचा कोणताही पर्याय समोर नसल्याने त्यांच्यावर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली. मशागत, कांदा बियाणे, लागवडीची मजुरी आणि पीक वाचवण्यासाठी केलेला औषधांचा खर्च वाया गेल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दिवस रात्र कष्ट करून सतत फवारणी करत कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने वाचवलेला कांदा पूर्णतः सडून गेला. पर्यायाने हतबल होऊन उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालवण्याची वेळ आली.
पुंडलिक निकम, शेतकरी, रायपूर.