

नाशिक : मालेगाव दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जवळ बसवत त्यांच्याशी चर्चा केल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
बुधवारी (दि.12) नांदूरमध्यमेश्वर (ता.निफाड) येथे श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी यांनी भुजबळ हे नेते नाहीत तर, रामभक्त असल्याचे वक्तव्य करत, त्यांच्या कामांचे कौतुकदेखील केले. त्यामुळे पुरोगामी भुजबळ यांची वाटचाल धार्मिकतेकडे सुरू आहे का? ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भैया जोशी यांचे आजोळ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर या गावी २५० वर्षांपूर्वीच्या राम मंदिराचा आता जीर्णोध्दार होत आहे. शासनाने यासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. या जीर्णोध्दाराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी संघाचे भैया जोशी आणि ज्येष्ठ नेते भुजबळ एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांच्या हस्ते कुदळ मारत मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर, दोघांनी मिळून श्रीरामाची आरती केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांनी भैयाजी जोशी यांच्या कार्याचे कौतुक करत, अनेकांना त्यांनी संस्कारी धार्मिक बनवले आहे. अहिल्यादेवींनी उभारलेली ही मंदिर जपण्याची गरज व्यक्त केल्याचे सांगितले. कुंभमेळ्याच्या आधी या राम मंदिराचे काम पूर्ण करा. केलेलं काम हे १०० वर्षे तरी टिकले पाहिजे असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. भैयाजी जोशी आणि मी एकत्र आलो पण परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आलो असल्याची टिपणीदेखील भुजबळ यांनी यावेळी केली. त्यावर जोशी यांनीही मार्गदर्शन करताना भुजबळ हे नेते नसून ते रामभक्त आहे. एका शक्तीचे ते प्रतीक असल्याने अशा कामात सर्व शक्तीने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भुजबळ यांच्या कामांचे कौतुक त्यांनी यावेळी केले.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. यावरून येवल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो. आजकाल काही आमदारांचे मुले कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल काही पत्ताच लागत नाही. त्यानंतर मला कोणीतरी सांगितले की काही नाही, पंकज भुजबळ हे मंदिरात गेले आहेत. म्हणून, मग मी म्हटले काही हरकत नाही, असे सांगत त्यांनी सावंत यांच्यावर टोलेबाजी केली.