

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी फाटा परिसरातील नरहरी नगर येथील चारवर्षीय बालिका विपश्यना मिलिंद बनसोडे हिच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि महापालिका प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाने केली आहे. या मागणीवर येत्या १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास बालिकेच्या पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेसमोर उपोषणाचा इशाराही पक्षाने दिला आहे.
पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेला निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, नरहरी नगर येथे राहणाऱ्या मिलिंद बनसोडे यांच्या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.
या प्रकरणात संबंधित डॉक्टर आणि महापालिकेच्या संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीची चौकशीची मागणी केली आहे. मुलीस योग्य वेळी आजाराचे निदान आणि उपचार मिळाले का, याचीही तपासणी करावी, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील स्वच्छता, साचलेले पाणी, डास नियंत्रण आणि डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, बालिकेचे पालक धार्मिक विधही आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या दुःखाच्या प्रसंगात कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पाशाने केली आहे.
या घटनेला एक महिना उलटूनही संबंधित यंत्रनांकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सानप, जिल्हाध्यक्ष प्रविण पगारे, ॲड. राहुल बनसोडे, किशोर गांगुर्डे, ॲड. सचिन अंभोरे आदी उपस्थित होते.