Remembering Ratan Tata : रतन टाटा यांची भेट ठरली प्रेरणादायी

Experiences of dignitaries | उद्योग महर्षी यांनी दिली मोठी शिकवण
Ratan Tata
रतन टाटा file photo
Published on
Updated on

नाशिक : समाजातील प्रत्येक घटकांसाठी आदर्शवत व्यक्तीमत्त्व असलेले उद्योगरत्न रतन टाटा यांना भेटण्याचा ज्यांना प्रसंग आला, त्यांच्यासाठी तो अनुभव जीवनाला दिशा देणारा ठरला. अवघ्या काही मिनिटांसाठी जरी रतन टाटा यांची भेट घेता आली तरी, आयुष्याला मोठी शिकवण मिळाल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

Summary

नाशिकमधील उद्योग, व्यवसाय, राजकीय क्षेत्रातील जी मंडळी रतन टाटा यांना भेटली, त्यांनी जीवन सार्थक झाल्याचा अनुभव कथन केला. साधेपणा हा या भेटींमधील सर्वाधिक भावणारा क्षण ठरला. नाशिकमधील राजकीय, व्यापार-उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे हे अनुभव....

नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या उद्घाटनानिमित्त दिवंगत उद्योगपती रतन टाटा नाशिकला आले होते. तेव्हा मी या शहराचा प्रथम नागरिक असल्याने, त्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. विमानतळावर त्यांचे स्वागत करायला गेलो, तेव्हा त्यांचे चरणस्पर्श करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांच्यातील साधेपणा भावणारा होता. अत्यंत मनमोकळेपणा आणि खुल्या दिलाचे व्यक्तीमत्त्व मला त्यांच्यात दिसले. त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी रांग होती. त्यात मी पण होतो. उत्तुंग व्यक्तीमत्त्व गमावल्याचे दु:ख आहे.

अशोक मुर्तडक, माजी महापौर, नाशिक.

रतन टाटा यांना भेटण्याचे ज्यांना भाग्य लाभले त्यापैकी मी पण एक आहे. नाशिकचे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर करता यावे, यासाठी एक अजेंडा तयार करून आम्ही त्यांना मेल केला होता. त्या मेलला काही दिवसांतच रिप्लाय आला अन् रतन टाटा यांच्या भेटीचे ठरले. मात्र, त्यांना परदेशात जावे लागल्याने, भेट पुढे ढकलली गेली. तब्बल दोन वर्षांनी पुन्हा भेटीचे निश्चित झाले. २२ जुलै २०१९ मध्ये मी, प्रदीप पेशकार आणि काही सहकारी रतन टाटा यांच्या भेटीसाठी मुंबई येथील टाटा सन्सच्या कार्यालयात पोहोचलो. ठरल्याप्रमाणे अडीच वाजता ते कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्याकडे डायरी होती. कोणत्याही मदतनीसला सोबत न ठेवता, स्वत:चे साहित्य घेवून ते आमच्याकडे आले. त्यांच्यातील साधेपणा अंगात ऊर्जा निर्माण करणारा होता. तब्बल ४५ मिनिटे त्यांनी आम्हाला वेळ दिला. यातील प्रत्येक सेंकद आयुष्याला दिशा देणारा होता.

आनंद सुूर्यवंशी, उद्योजक, नाशिक.

जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असतानाही उद्योगरत्न रतन टाटा यांच्यामधील नम्रपणा कधीही विसरण्यासारखा नाही. जेव्हा आम्ही त्यांच्या भेटीसाठी गेलो, तेव्हांचा अनुभव आयुष्याला शिकवण देणारा ठरला. आम्ही जोवर बसत नाही, तोवर ते बसले नाहीत. याशिवाय जेव्हा चहा आणला गेला, तेव्हा त्यांनी चहा आम्हाला दिला. त्यांची ही कृती प्रचंड प्रेरणादायी ठरली. यावेळी मी त्यांच्यासमोर योगा विद्यापीठ आणि वेलनेस हबचे प्रेझेंटेशन दिले. ते इतके भावले की, त्यांनी लगेचच त्यांचे सीईओ चंद्रशेखर यांना बोलावून घेतले. त्यांना वेलनेस हबविषयी एेकण्यास सांगितले. सुरुवातीला आम्हाला दहा मिनिटांचा अवधी दिला होता. परंतु त्यांनी आम्हाला तब्बल ४५ मिनिटे वेळ दिला.

किरण चव्हाण, माजी अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक.

बॉटनिकल गार्डनच्या उद्घाटनानिमित्त उद्योगरत्न रतन टाटा नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी, 'मंत्रभूमी ते तंत्रभूमी' अशी नाशिकची प्रगती झाल्याबाबतचे गौरवोद्गार काढले होते. नाशिककरांसाठी ही आठवण सुखावणारी आहे. रतन टाटा यांनी देशात कंपनी नव्हे तर संस्कृती निर्माण केली असून, त्याचा आदर्श प्रत्येकांसाठीच महत्त्वाचा आहे. कुठलाही बडेजाव न आणता, जगभरात लौकीक कसा निर्माण करावा याची शिकवणच रतन टाटा यांनी देशातील प्रत्येकाला दिली आहे.

धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा. नाशिक.

देशातील एक आदर्श व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतनजी टाटा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! टाटा समूहाने व टाटा परिवाराने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. तोच वारसा सक्षमपणे पुढे चालवत रतन टाटा यांनी सामाजिक जाणीव देखील जपली. त्यांच्यासारख्या प्रेमळ, सोज्वळ व शालीन व्यक्तिमत्वाचं निधन ही समस्त भारतीय उद्योगविश्वाची खूप मोठी हानी आहे. त्यांचे निधन म्हणजे टाटा कुटुंबासोबतच महाराष्ट्र व देशातील जनतेवर देखील दुःखाचा मोठा आघात आहे. दिवंगत रतनजी टाटा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!

छगन भुजबळ, मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

देशातील एक आदर्श व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतनजी टाटा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. भारताची मोठी हानी झाली असून भारत मातेचा सच्चा हिरा गमावला आहे. भारताच्या उद्योग विश्वाला समृध्द करणाऱ्या टाटा समूहाने व टाटा परिवाराने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. तोच वारसा सक्षमपणे पुढे चालवत रतनजी टाटा यांनी सामाजिक जाणीव देखील जपली. यशाचे शिखर गाठलेले असताना देखील त्यांचे पाय मात्र जमिनीवरच होते हे अभिमानास्पद आहे. त्यांचे निधन म्हणजे टाटा कुटुंबासोबतच महाराष्ट्र व देशातील जनतेवर देखील दुःखाचा मोठा आघात आहे.

दादाजी भुसे, पालकमंत्री, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news