

देवगाव (निफाड, नाशिक) : निफाड तालुक्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले आहे. शेतकरी पोर्टलवर तालुक्यातील ५१ हजार १७७ शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड आहेत. त्यापैकी प्रशासनाने ४४ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केली असून अनुदानाची रक्कम ३३ कोटी ८ लाख रुपये आहे. मात्र, अद्यापही पाच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. द्राक्ष, कांदा, मका, कापूस या पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. शेतजमिनींत पाणी साचले असून फळबागा कोसळल्या. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. परिणामी, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले होते.
अजूनही ५,२९८ शेतकरी प्रतिक्षेत
तालुक्यातील उर्वरित ५,२९८ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. एकत्रित क्षेत्र, ॲग्रीस्टॅक नसणे, काही प्रकरणांत जमीन नोंदणीतील विसंगती, बँक खात्याची अपूर्ण माहिती, आधार पडताळणीअभावी वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महसूल विभागाकडून या त्रुटी दूर करत उर्वरित शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे प्रयत्न आहेत.
सर्व पिकांना फटका
सलग पावसामुळे बागांत ओलसरपणा असून मुळकूज, पानगळ आणि बुरशीजन्य रोग वाढले. कांदा पीक नष्ट झाले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेत शेतीत गुंतवणूक केली होती. त्यामुळे नुकसानीनंतर कर्जफेडीचे ओझे त्यांच्या खांद्यावर आहे. अनुदानाची मदत तात्पुरता दिलासा देणारी असली तरी हा प्रश्न एका हंगामापुरता नाही. बदलत्या हवामान पद्धतीमुळे दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थिर व टिकाऊ हवामानानुकूल शेतीसाठी प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा रोष आणि अपेक्षा
सर्वेक्षण योग्यरीत्या झाले नाही. अनेक शेतकरी मदतीसाठी प्रतीक्षेत आहेत. अर्ज करून तीन महिने झाले. पण खात्यात पैसे आले नाहीत. द्राक्षहंगाम नसताना सप्टेंबरमध्ये पंचनामे करत उत्पादकांना तुटपुंजी मदत देण्यात आली. त्यामुळे आता हंगाम सुरू झाल्यावर प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मका -८४८५.१, सोयाबीन- ७९०१.१, कांदा -२८०, कांदा रोप- १०७, टोमॅटो -१२५२, भाजीपाला -३६३, डाळिंब -१७.९, द्राक्षे -३५
सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेल. काही अर्जांची पडताळणी प्रलंबित आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल दर आठवड्याला प्रशासनास पाठवला जातो. शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत आहे.
विशाल नाईकवाडे, तहसीलदार, नाशिक
तालुक्यातील महसूल, कृषी आणि पंचायत समितीकडून एकत्रित प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचे दस्तऐवज तपासून अनुदान प्रक्रिया वेगाने पार पाडावी यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत पडताळणी करत आहोत. उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, नाशिक