

नाशिक : प्रफुल्ल पवार
नाशिकमध्ये वाढत्या विवाह खर्चामुळे नवविवाहित जोडप्यांचा रजिस्टर मॅरेजकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पारंपरिक सोहळ्यातील लाखोंच्या खर्चाला फाटा देत गेल्या पाच वर्षांत तब्बल सात हजाराच्या जवळपास जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करणे पसंत केले आहे. यात सुशिक्षित, आंतरजातीय तसेच कुटुंबीयांचा विरोध असलेल्या विवाहांचाही समावेश आहे.
पारंपरिक विवाह म्हणजे मानपान, हॉल, मंडप सजावट, पंचपदरी भोजनावळीवर प्रचंड खर्च हाेतो. विशेषतः वधुपित्याच्या खांद्यावर मोठा आर्थिक भार येतो. अनेकांना विवाहानंतर पासपोर्ट, व्हिसा, कायदेशीर ओळख यासाठी मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी पुन्हा सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागते. याचा विचार करत जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी थेट नोंदणी विवाह करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. सोने चांदीच्या वाढती किंमती, भाजीपाला व किराण्याच्या दरातील वाढ आणि एकूणच महागाईमुळे विवाह सोहळ्याचा खर्च आता लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे वाढीव खर्च टाळून भविष्यासाठी बचत करण्यासाठी तरुण जोडपी नोंदणी विवाहास अधिक प्राधान्य देत आहेत.
सध्या नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक निबंधक वर्ग १ कार्यालयात विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जाची सोय असली तरी तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचेही समोर आले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुण मात्र अद्यापही नोंदणी करण्यासाठी जात नसल्याचे दिसून येत आहे.
रजिस्टर मॅरेज का आवश्यक
विवाहास तत्काळ कायदेशीर मान्यता
पासपोर्ट, बँक, सरकारी दस्तऐवजांसाठी गरजेचा
कुटुंबीयांचा विरोध असल्यास पोलिस संरक्षण
संपत्ती हक्क, वारसदार बदलणे, विमा प्रक्रिया
प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी सुरक्षा आणि समाजातील वैध ओळख
अनेकांनी विवाह केले असले तरी सर्टिफिकेट घेतलेले नाही. कायदेशीर कागदपत्रे आणि मुलगा २१, मुलगी १८ वर्षांची असल्याची पडताळणी करूनच आम्ही प्रमाणपत्र देतो. ज्यांनी विवाह नोंदणी केलेली नाही त्यांनी अधिकृत विवाह नोंदणी करून घ्यावी.
विजय राजोळे, विवाह नोंदणी अधिकारी, नाशिक
मोठ्या खर्चाचा विवाह टाळून कमी खर्चात रजिस्ट्रेशन पद्धतीचा अवलंब वाढला आहे. विवाहातील बचत भविष्यातील सुरक्षिततेसाठी वापरण्याचा कल वाढत आहे. सरकारी प्रक्रियांना वैधता आणि सुलभता मिळाल्याने जोडपी नोंदणी विवाहाला प्राधान्य देताना दिसतात.
अॅड. कैलास गावित, नाशिक