Nashik IT firm harassment probe |लंगडत, हात जोडून एरंडेही म्हणाला, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’

पोलिस तपासात त्याच्याकडून तब्बल १२१ व्हिडिओ निष्पन्न झाले असून, इतरही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत
Nashik IT firm harassment probe |लंगडत, हात जोडून एरंडेही म्हणाला, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’
Published on
Updated on

नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला नराधम रवींद्र एरंडे यालादेखील पोलिसांनी युनिट एकची सफर घडवून आणल्यामुळे त्याने लंगडत बाहेर पडत अन् हात जोडत, ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असे म्हटले. गोरगरीब महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एरंडेने विकृतीचा कळस गाठताना या महिलांसोबतचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. पोलिस तपासात त्याच्याकडून तब्बल १२१ व्हिडिओ निष्पन्न झाले असून, इतरही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

एरंडे सध्या पोलिस कोठडीत असून, चौकशीत त्याच्याकडून इतरही अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करायचा आहे. मात्र, तो तपासात सहकार्य करीत नसल्याने, त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. शहरातील सराईत गुन्हेगारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी पोलिसांनी निर्माण केलेल्या आगळ्या-वेगळ्या पॅटर्नचा पाहुणचार एरंडेलाही देण्यात आला. यापूर्वी भोंदू अशोक खरातकडूनदेखील पोलिसांनी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ वदवून घेतले होते. त्यानंतर आता रवींद्र एरंडेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयाची झडती घेतली होती, तेव्हा तो पोलिसांसोबत हसताना दिसून आला होता. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्समध्ये संतापाची लाट पसरली होती. गोरगरीब महिलांचे लैंगिक शोषण करणारा नराधम पोलिसांसमोर हसतोच कसा? असा संतप्त सवाल अनेकांना उपस्थित केला होता. याशिवाय, त्याच्याकडून कायद्याचा बालेकिल्ला का वदवून घेतले जात नाही, असाही प्रश्न अनेकांना पडला होता.

राजकीय दबावाचा प्रयत्न

रवींद्र एरंडे हा स्वतःला पत्रकार म्हणून मिरवून घेत, त्याने अनेक राजकारण्यांशी सलगी साधली होती. जेव्हा त्याचे बिंग फुटले, तेव्हा त्याने याच राजकारण्यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. एरंडे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याने, तेथील राजकारण्यांचे आणि नाशिकमधील राजकारण्यांचेही पोलिसांना फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी न जुमानता, एरंडेच्या तोंडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ वदवून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news