

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र, सिन्नर तालुक्यात अद्याप २३ हजार ५०१ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण २ लाख ११ हजार ९७५ लाभार्थी असून, त्यापैकी १ लाख ८८ हजार ४७४ लाभार्थ्यांची म्हणजे सुमारे ८८.९ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ११.१ टक्के बाकी आहे. उर्वरित लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी स्वस्त धान्य दुकानात जाणे शक्य नसल्यास शासनाने घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित सदस्यांचा भविष्यातील धान्यलाभ बंद होण्याची शक्यता असल्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
एकूण लाभार्थी : २,११,९७५
ई-केवायसी पूर्ण : १,८८,४७४
ई-केवायसी बाकी : २३,५०१
ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी प्ले स्टोअरवरून 'Mera eKYC App' डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करावी. तसेच स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारेही ही प्रक्रिया करता येणार आहे.